-->
डॉक्टरांना संरक्षण द्या

डॉक्टरांना संरक्षण द्या

गुरुवार दि. 23 मार्च 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
------------------------------------------------
डॉक्टरांना संरक्षण द्या
सध्या बेमुदत संपावर असलेल्या राज्यातील शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांना न्यायलयाने तातडीने संप मागे घेऊन कामावर येण्यास सांगितले आहे. न्यायलयाने या संपकरी डॉक्टरांना चांगलीच तंबी दिली आहे. डॉक्टरांनी कामगारांसारखे वागू नये, जर त्यांना अगदीच भीती वाटत असेल तर नोकरी सोडावी अशी टोकाची भूमिकाही न्यायालयाने मांंडली आहे. आता न्यायलयाने दिलेल्या या निकालामुळे डॉक्टर रुग्णालयात परतू लागले आहेत. आता हा संप फारच कमी ठिकाणी शिल्लक आहे. न्यायालयाने डॉक्टरांना त्यांनी केलेल्या संपाबाबत चांगलेच धारेवर धरले हे बरेच झाले परंतु याला देखील दुसरी बाजू आहे, हे न्यायालयाने ध्यानात घेणे गरजेचे आहे. डॉक्टर हा दुसर्‍यांचे जीव वाचवितो, परंतु प्रत्येक रोग्याला वाचविणे हे त्याचा काही हातात नसते. कधी तरी रोग्याचा आजार जर गंभीर असेल किंवा अपघातग्रस्त रुग्ण असल्यास तो दगावण्याचा धोका जास्त असतो, अशा प्रसंगी रुग्णाचे नातेवाईक डॉक्टरांना जबाबदार धरतात व त्यांना मारहाण केली जाते. अनेकदा अशा प्रकारातून केवळ डॉक्टरांनाच मारहाण नव्हे तर रुग्णालयाचे मोठे नुकसान केल्याच्या घटना गेल्या काही वर्षात घडल्या आहेत. जर एखाद्या डॉक्टरांनी वा रुग्णालयाने औषधोपचार करण्यास दिरंगाई केली व त्यात रुग्ण दगावला तर ती चूक संबंधीत डॉक्टरांची असू शकते मात्र प्रत्येक बाबतीत डॉक्टरांना जबाबदार धरुन त्यांना मारहाण करणे चुकीचे आहे. अर्थात रुग्णाचे नातेवाईक त्यावेळी एखादी स्थिती समजून घेण्याच्या मनस्थितीत नसतात, त्यामुळे आपला नातेवाईक-मित्र दगावल्यावर ते पहिला दोष डॉक्टरांना देतात व रागाच्या भरात मारहाण करतात. अर्थात ही रुग्णांच्या नातेवाईकांची पूर्ण चूक आहे. असा या परिस्थितीत अनेकदा डॉक्टर भरडला जातो. त्यामुळे सरकारी रुग्णालयात डॉक्टरांना संरक्षण देण्याची आवश्यकता आहे. अलिकडेच धुळे, नाशिक, मुंबई व औरंगाबाद येथील सरकारी रुग्णालयात डॉक्टरांना मारहाणीचे प्रकार झाले. एका प्रकारात तर डॉक्टरांना एवढी बेदम मारहाण झाली की नागरिकांच्या कौर्याची कल्पना त्यावरुन येते. अशा स्थितीत जीव वाचविणार्‍या डॉक्टराचाच जीव धोक्यात आल्यासारखी स्थीती आहे. त्यामुळे या डॉक्टरांना संप पुकारला यात काही गैर आहे असे नव्हे. सर्वात दुदैवाची बाब म्हणजे आपल्याकडे सरकारी रुग्णालयांची स्थिती अतिशय वाईट असते. अनेकदा तेथे चांगली उपकरणे असतात तर डॉक्टर्स नसतात आणि डॉक्टर्स असले तर किमान पायाभूत सुविधा नसतात. अशा स्थितीत हे डॉक्टर कामे करीत असतात. औषधांचा पुरवठा हा एक मोठा गंभीर प्रश्‍न असतो. यात असलेला भ्रष्टाचार हा त्या रुग्णालयापासून ते थेट मंत्रालयापर्यंत साखळी मार्गाने पोहोचलेला असतो. यात रुग्णांना अनेकदा औषधे उपलब्ध होत नाहीत. गरीब रुग्मांना खुल्या बाजारातून औषधे घेणे परवडत नाही. तरी ती घेण्याशिवाय पर्याय नसतो. यातून एकूणच आपली आरोग्यव्यवस्था कोमात गेल्याच्या स्थीतीत आहे. परंतु त्याकडे कुणीही लक्षव घ्यायला तयार नाही. औषधातील भ्रष्टाचार हा प्रकार गेली कित्येक वर्षे सर्रास सुरु आहे. आता युती सरकार आल्यावर तरी याला आळा बसेल अशी अपेक्षा होता परंतु भ्रष्ट यंत्रणा तशीच सुरु आहे. सरकार आरोग्य व्यवस्थेकडे सातत्याने दुर्लक्ष करत आले आहे. अनेक डॉक्टर आहेत की जे सेवाभावी वृत्तीने सरकारी व्यवस्थेशी जुळवून काम करत असतात. या डॉक्टरांनाही माणूस म्हणून आपल्या मर्यादा जेवढ्या माहिती असतात तेवढ्याच त्यांना वैद्यकीय यंत्रणांच्या मर्यादा जनतेपेक्षा अधिक समजत असतात. लांब दूरवरून गंभीर आजार झालेला एखादा रुग्ण जेव्हा सरकारी रुग्णालयात उपचारासाठी येतो तेव्हा त्याच्यावर मर्यादित यंत्रणेत उपचार करावे लागतात व ते केले जातात. सरकारी रुग्मांची मर्यादा लक्षात घेऊन डॉक्टर रुग्णाची व त्यांच्या नातेवाइकांची मानसिक,आर्थिक परिस्थिती समजून योग्य तो सल्ला देण्याचे काम करत असतात. धुळ्यात, नाशिक व मुंबईत डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या घटना या सुसंस्कृततेला धरून नाहीत. कारण रुग्णालयातल्या यंत्रणांची कमतरता हा डॉक्टरांचा दोष नाही. असे हल्ले रोज व्हायला लागले तर डॉक्टरांचे रुग्णांशी असलेले ममत्व कमी होईल. रुग्णांना डॉक्टरांच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका येईल. जर एखाद्या डॉक्टराने चुकीचा उपचार केला व त्यात रोगी दगावला तर त्याच्यावर न्यायालयीन लढाई करता येते, मात्र त्यात त्या डॉक्टरालाच मारहाण करणे योग्य नाही. आता डॉक्टरांनी संप केल्यामुळे शंभराच्या घरात रुग्ण दगावल्याचा सरकारी आकडा सांगतो. याला जबाबदार कोण असाही सवाल उपस्थीत होतो. आपल्याकडे आता जनतेची सहनशक्ती संपल्यासारखी झाली आहे, त्यामुळे तो एखादा सॉफ्ट टार्गेट शोधून त्याला मारहाण करुन आपल्या मनाचे समाधान करुन घेतो. मात्र यामुले प्रश्‍न सुटत नाहीत तर त्यातील गुंतागुंत अधिकच वाढते. मात्र हे समजावून घेण्याच्या मनस्थितीत कोणीच नसतात. यासाठी आपल्याला संपूर्ण आरोग्य व्यवस्थेकडेच नव्याने पहावे लागेल. सर्वात प्रथम म्हणजे आरोग्य व्यवस्था चांगली असण्यासाठी तिच्यासाठी सरकारने पुरेसा निधी उपलब्ध करुन दिला पाहिजे. आपल्याकडे आपण जेमतेम दोन टक्केच खर्च आरोग्यावर करतो. त्यामुळे जादा निधी सरकारने उपलब्ध करुन दिला पाहिजे. तसेच एकूण भ्रष्ट व्यवस्था थांबली पाहिजे. रुग्णांच्या तपासणीसाठी चांगली उपकरणे, चांगले डॉक्टर्स, सेवाभावी कर्मचारी वर्ग, सर्व औषधे उपलब्ध करणे, डॉक्टरासाठी सेवा नियमावली आखली गेली पाहिजे. हे सर्व आदर्श वाटते पण ते आपण करु शकतो. यात केवळ सरकारच नव्हे तर रुग्ण, डॉक्टर, नातेवाईक या सर्वांचा यात सहभाग हवा. तरच ही यंत्रणा बदलली जाऊ शकते. यातून डॉक्टरांवरील हल्ले होणार नाहीत, परंतु सध्या तरी डॉक्टरांना रुग्णालयात संरक्षण देण्याची आवश्यकता आहे, हे नक्की.
-----------------------------------------------------------------

0 Response to "डॉक्टरांना संरक्षण द्या"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel