-->
महापौरपदाचा घोडेबाजार

महापौरपदाचा घोडेबाजार

संपादकीय पान शनिवार दि. 04 मार्च 2017 च्या अंकासाठी अग्रलेख 
--------------------------------------------
महापौरपदाचा घोडेबाजार
मुंबईत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यामुळे तसेच भाजपा व शिवसेना हे दोन्ही पक्ष आपलाच महापौर व्हावा यासाठी अडून बसल्याने यासाठी घोडेबाजार जोरदार सुरु होणार अशी चिन्हे दिसत आहेत. गेली पाच वर्षे शिवसेनेसोबत असणार्‍या अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी यांना आपल्या गोटात सामावून घेण्याचा जोरदार प्रयत्न भाजपाकडून केला जात असून त्यासाठी तुरुंगात असलेल्या अरुण गवळीशी चर्चा केली जाणार आहे. शिवसेनेचा प्रस्ताव धुडकावून गीता गवळी भाजपाच्या गोटात जाण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. मात्र गीता गवळ यांना आपल्या गटात आणण्यासाठी भाजपा कोणता सौदा करणार आहे? हे गुपीत लवकरच उघड झाल्याशिवाय राहाणार नाही. महापौरपद आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी शिवसेना-भाजपाचे नेते इरेला पेटले आहेत. भारतीय जनता पार्टीने साम-दाम, दंड-भेद या सर्व मार्गाचा वापर करून शिवसेनेला मुंबईतून हद्दपार करण्यासाठी प्रयत्न केला. तरीही 84 जागा मिळवून शिवसेना सर्वात मोठा पक्ष झाला आहे. इतरही पाच अपक्षांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्याने त्यांचा 89 नगरसेवकांचा गट नोंदविला गेला आहे. तर भाजपाची सदस्य संख्या 82 आहे व अजून ही संख्या काही पुढे जात नाही असे दिसते. 31 नगरसेवक निवडून आलेल्या काँग्रेस पक्षाकडूनही आपला उमेदवार महापौरपदासाठी उभा करण्याची तयारी केली जात आहे. त्यामुळे 114 चा मॅजिक आकड्याची आवश्यकता न भासता ज्या उमेदवाराला जास्त मते पडतील त्यांचा महापौर होऊ शकणार आहे. म्हणूनच भाजपाने आता जास्तीत जास्त अपक्ष आणि छोट्या पक्षाला बरोबर घेण्याची तयारी केली आहे. कॉग्रेसने आपला उमेदवार उभा केल्यास किंवा सभात्याग केल्यास त्याचा अप्रत्यक्ष फायदा हा शिवसेनेला होणार आहे. कदाचित शिवसेना व कॉग्रेसचा तसा समझोता झाला असण्याची शक्याता काही नाकारता येणार नाही. शिवसेनेकडे पाच अपक्ष गेल्याने आता दोनच अपक्ष शिल्लक आहेत. राष्ट्रवादीचे 9 आणि मनसेच्या 7 नगरसेवकांची भूमिका यात महत्त्वाची ठरणार आहे. भाजपाकडून प्रत्येकाला आपल्या बाजूला वळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सहयोगी सदस्य म्हणून गीता गवळी गेली पाच वर्षे शिवसेनेसोबत होत्या. यावेळीही त्या शिवसेनेसोबत राहतील, असे वाटले होते. त्याप्रमाणे गुरुवारी त्यांनी शिवसेना भवनामध्ये जाऊन अनिल देसाई आणि एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. मात्र ही चर्चा होण्याच्या अगोदरच भाजपाकडून गीता गवळी यांच्याशी संपर्क साधण्यात आल्याने शिवसेनेशी गीता गवळी यांची चर्चा फिसकटली आहे. एक वर्षे आरोग्य समितीचे अध्यक्षपद आणि चार वर्षे स्थायी समितीचे सदस्यपद मिळावे, अशी मागणी गीता गवळी यांनी केली आहे. शिवसेनेशी बोलणी फिसकटल्यानंतर गीता गवळींना चर्चा करण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांनी निमंत्रण दिले. या सर्व प्रकरणी मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार आणि प्रसाद लाड मध्यस्थाची भूमिका पार पाडीत असल्याची चर्चा आहे.

0 Response to "महापौरपदाचा घोडेबाजार"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel