-->
कोकणासाठी उर्जा

कोकणासाठी उर्जा

संपादकीय पान सोमवार दि. 06 मार्च 2017 च्या अंकासाठी अग्रलेख 
--------------------------------------------
कोकणासाठी उर्जा
केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी केलेला कोकणाचा दौरा कोकणासाठी नवी उर्जा देणारा ठरणार आहे. ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना पद्मश्री जाहीर झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करणे व मुंबई-गोवा महामार्गाची पहाणी करण्याकरता गडकरी मुद्दाम काही तासांच्या दौर्‍यावर आले होते. गजकरी हे अत्यंत कार्यक्षम मंत्री म्हणून ख्याती असलेले आहेत, त्यांनी आपली कार्यक्षमता यापूर्वी मुंबईत 56 फ्लायओव्हर व मुंबई-पुणे एक्स्प्रेस रस्ता उभारुन दाखविली होती. आता त्यांनी मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाची पहाणी तसेच अलिबाग-वडखळ या रस्त्याचे चौपदरीकरण करण्याची केलेली घोषणा कोकणाला एक नवी उर्जा देेणारी ठरणार आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामातील 471 कि.मी. अंतराच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. यातील फक्त कशेडी घाटातील बोगद्याची निविदा निघालेली नाही. ही सर्व प्रकारची सुमारे बारा हजार कोटी रुपयांची कामे आहेत. सरकारने याच्यासाठी निधीची तरतूद करुन ठेवल्याने हा प्रकल्प आता निदीअभावी काही रखडण्याची चिन्हे नाहीत, ही त्यातील सर्वात समाधानाची बाब म्हटली पाहिजे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पूलांची कामे यापूर्वीच सुरु झाली आहेत. लवकरच निविदा काढून कशेडी घाटातीलही काम येत्या दोन-तीन महिन्यास सुरु होईल असा विश्‍वास गडकरी यांनी व्यक्त केला आहे. हा रस्ता पूर्ण होण्यासाठी डिसेंबर 2018 साली उजाडेल असा अंदाज आहे. यापूर्वीच्या सरकारने पहिल्या टप्प्यातील पनवेल-इंदापूर हे काम हाती घेतले होते. मात्र यात अनेक चुका झाल्या, अनेकदा कंत्राटदारांचे घोळ झाले यातून हे सर्वच गणित फसले त्यामुळे हा सर्व घोळ निस्तारण्यासाठी नवीन सरकारला काही काळ घालवावा लागला. आता अखेर हे सर्व मार्गी लावत या रस्त्याचे काम सुरु झाले. येत्या महिन्याभरात या रस्त्याचे 50 टक्के काम मार्गी लागेल, त्यासाठी 540 कोटी रुपये केंद्र सरकार देणार आहे. त्याचबरोबर महाड ते रायगड, अलिबाग-वडखळ या मार्गासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून ही कामे लवकरच सुरु केली जाणार आहेत. या रस्त्यामुळे कोकणाच्या सौंदर्यात आणखी भर घालण्यासाठी या रस्त्याच्या कडेला झाडे लावण्यात येणार आहेत. त्यामुळे या रस्त्याच्या बाजूला रखरखीतपणा नसेल. त्याच बरोबर कोकणातील या जुन्या रस्त्यावरील अनेक वृक्ष हे जुने आहेत. त्यांची रस्ता मोठा करताना कत्तल न करता ते मुळासकट उचलून अन्य ठिकाणी हलविण्याचे एक नवीन तंत्रज्ञान विकसीत केले आहे. यापूर्वी विदेशात वापरले जाणारे हे अत्याधुनिक तंत्रज्ञान आता आपल्याकडेही गडकरी यांनी उपलब्ध केले आहे. या नवीन महागामार्गामुळे मुंबई-गोवा हे अंतर केवळ सहा तासांवर येऊन ठेपेल. सध्या या रस्त्यावर होत असलेले अपघात पाहता या रस्त्याची तातडीने गरज आहे. सध्या या रस्त्यावर दरवर्षी हजारो लोकांना आपले जीव गमवावे लागत आहेत. यावर उपाय म्हणजे हा दोनपदरी रस्ता होणे गरजेचे आहे. अलिकडेच महाड येथील शंभर वर्षे जुना असलेला रस्ता पावसात वाहून गेला होता. याच ठिकाणी नवीन पूल बांधण्याचे काम सध्या जोरात सुरु असून हा पूल येत्या पावसाळ्याअगोदर म्हणजे जून पर्यंत पूर्ण होणार आहे. सरकारने हा पूल सहा महिन्यात उभारण्याचे आश्‍वासन दिले होते हे खरे परंतु निदान पावसाळ्याअगोदर जरी पूर्ण केला तरी प्रवाशांचा जीव भांड्यात पडेल. मुंबई-गोवा नवीन महामार्गाचे काम उशीरातउशीरा डिसेंबर 18 पूर्वी करण्याचे आश्‍वासन गडकरी यांनी दिले आहे व ते पाळतील असा विश्‍वास वाटतो. कारण गडकरी यांनी यापूर्वी अनेक पायाभूत प्रकल्प उभारुन दाखविले आहेत. त्याच धर्तीवर हा प्रकल्पही ते उभारुन दाखवितील असा विश्‍वास वाटतो. या मार्ग एकदा पूर्ण झाला की, पर्यटनाचे एक नवीन दालन कोकणासाठी खुले होणार आहे. गोव्यातील काही पर्यटक कोकणात वळू शकेल. तसेच सद्या मुंबई-गोवा हा विमान प्रवास जरी एक तासाचा असला तरी हा विमानतळ गोव्याच्या एका टोकाला असल्याने मुंबईच्या प्रवाशांना एकूण प्रवासाचे जवळपास तीन तासच लागतात. त्यामुळे हा प्रवास सहा तासावर आल्यास अनेक पर्यटकांना फायदा होणार आहे. नितीन गडकरी यांच्या सांगण्यानुसार, मुंबई-गोवा हा रस्ता मंगलोरपर्यंत विस्तारीत करण्यात येणार आहे. त्यामुळे कर्नाटकातील ही किनारपट्टी या रस्त्याने व्यापली जाईल. एकीकडे मुंबई-गोवा महामार्ग दुपदरी होत असताना वडखळ ते अलिबाग हा रस्ता चारपदरी करण्यासाठी निविदा काढल्या जात आहेत. शेकापचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांनी हा रस्ता मार्गी लागावा यासाठी सुरुवातीपासून प्रयत्न केले होते, त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. यामुळे वडखळ ते अलिबाग हे अंतर केवळ 12 मिनिटात कापले जाईल. तसेच अलिबाग ते रेवदंडा या रस्त्याचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे. त्यामुळे हा रस्ता उत्कृष्ट दर्ज्याचा होईल. ब्रिटीशांच्या काळातील सर्व रस्ते नव्याने बांधले जातील, अशी महत्वपूर्ण घोषणा नितीन गडकरी यांनी केली आहे. तसेच कोकणात जाणार्‍यांसाठी भाऊचा धक्का ते मांडवा अशी रो-रो सर्व्हिस सुरु केली जाणार आहे. तसेच नियोजित सागरी महामार्ग सरकारने पूर्ण केल्यास कोकणाच्या पर्यटन वाढीला आणखी वाव मिळेल. गेल्या दशकात कोकणाकडे विविध राजकीय नेत्यांनी फारसे लक्ष दिले नव्हते. त्यामुळे अनेक पायाभूत प्रकल्प उभे राहू शकले नाहीत. आता नितीन गडकरी यांच्या रुपाने कार्यक्षम मंत्री लाभल्याने कोकणातील अनेक पायाभूत प्रकल्प मार्गी लागतील, असे दिसते.
--------------------------------------------------------------

0 Response to "कोकणासाठी उर्जा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel