-->
शिवतिर्थावर तरुणाई

शिवतिर्थावर तरुणाई

बुधवार दि. 22 मार्च 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
------------------------------------------------
शिवतिर्थावर तरुणाई
रायगड जिल्हापरिषदेचे मुख्यालय असलेल्या शिवतिर्थावर खर्‍या अर्थाने तरुणाईचे वारे सत्तेत घुमू लागले आहे. शेतकरी कामगार पक्षा व राष्ट्रवादी यांच्या आघाडीने पुन्हा सत्ता काबीज केल्यावर अध्यक्षपदी आदितीताई तटकरे व उपाध्यक्षपदी आस्वाद उर्फ पप्पूशेठ पाटील यांची अपेक्षित निवड झाल्याने शिवतिर्थावर तरुणाई सत्तेत आली आहे. या निमित्ताने शेकाप व राष्ट्रवादीची पुढील तरुण पिढी सत्तेत आली असल्याने एक नवे राजकारण आता वेग घेईल असे म्हणावयास काहीच हरकत नाही. विद्यमान अध्यक्ष व उपाध्यक्ष हे दोघेही तरुण नेते तर आहेतच शिवाय ते दोघेही रोह्यातून निवडून आल्याने रोह्याला एक मोठा मान या निमित्ताने मिळत आहे. नुकत्याच झालेल्य जिल्हा परिषदेच्या निवडणुकात शेकापला 23 व राष्ट्रवादीला 12 जागा पटकाविता आल्याने सत्ता याच आघाडीची होणार ही काळ्या दगडावरची रेघ होती. मात्र ज्या पक्षांचा पराभव झाला त्यांना काही तरी चमत्कार घडवून सत्ता काबीज करावयाची होती, परंतु ते कदापीही शक्य होणार नाही, हे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. या विजयानंतर शेकाप-राष्ट्रवादीच्या आघाडीचा एक नवा अध्याय आता सुरु झाला आहे. देशात सध्या प्रतिगामी शक्तींनी डोके वर काढले असताना पुरोगामी ठसा असलेल्या व शिवाजी महारांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या रायगडच्या भूमीत तरी पुरोगामी शक्तींनी एकत्र यावे व जातियवाद्यांचा पराभव करावा यासाठी शेकाप-राष्ट्रवादी-कॉग्रेस ही आघाडी जन्माला आली. या आघाडीच्या वतीने पुरोगामी शिक्षक आघाडी स्थापन करुन शेकाप नेते बाळाराम पाटील यांना विधानपरिषदेत पाठविले. या आघाडीचा हा पहिला सर्वात मोठा विजय होता. गेली तीन दशके असलेली येथील मक्तेदारी मोडीत काढून शिक्षकांनी बाळाराम पाटील यांना विधानपरिषदेत पाठविले. त्यानंतर लागोपाठ आलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पुन्हा रायगडवासियांनी याच आघाडीच्या बाजूने कौल दिला आणि शेकाप-राष्ट्रवादी-कॉग्रेस यांच्या आघाडीने विजयश्री खेचून आणली. सुरुवातीपासून शेतकरी कामगार पक्षाचा रायगड जिल्हा हा बालेकिल्ला होता व भविष्यातही तो राहाणार आहे, हे या निवडणुकीने स्पष्टपणे पुढे आले आहे. आज देशात व राज्यात शिवसेना-भाजपा या प्रतिगामी शक्तींची सरकारे आली असताना व याच शक्ती देशात आक्रमकपणे चाल करुन स्थानिक स्वराज्य पातळीवर सर्व पदे बळकावित असल्याचे चित्र दिसत असताना रायगड जिल्ह्याने हे चित्र बदलण्याचा एक चांगला पायंडा पाडला आहे. संपूर्ण राज्यात प्रतिगामी शक्ती जोमाने डोके वर काढीत असताना रायगड जिल्हा मात्र यला अपवाद ठरला आहे. याचे अनेकांना आश्‍चर्यही वाटेल. परंतु त्यांनी इतिहासात डोकावण्याची गरज आहे. या विजयाचे सर्व श्रेय शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनिल तटकरे यांच्याकडेच जाते. या दोघांनी मिळून संपूर्ण जिल्हा पिंजून काढला व आघाडीच्या बाजुने जोरदार प्रचार केला, शिवसेनेवर घणाघाती प्रचार केला. हे दोन्ही नेते एकत्र येऊन त्यांनी प्रचार केल्यामुळे मतदारांमध्ये एक प्रकारचा विश्‍वास संपादन झाला व आघाडीच्या बाजुने मतदारांचा कौल कसा झुकला याचा कुणालाच अंदाज बांधता आला नाही. राजकारण हे अल्पकालीन फायद्याचे उदिष्ट ठेवून केल्यास त्याचा कधीच फायदा होत नाही. संसदीय राजकारणात निवडणुकीच्या राजकारणात जय-पराजय हा कुणासही चुकलेला नाही. अगदी इंदिरा गांधींचाही पराभव झालेला आहे. अशा वेळी संकुचित दृष्टीकोन ठेवून राजकारण करणार्‍यांना जनता लवकर घरी बसविते, हा इतिहास आहे. सध्याच्या काळात आघाडीचे राजकारण हे अनिवार्य ठरले आहे. केंद्रात देखील तब्बल तीन दशकानंतर एकाच पक्षाचे सरकार सत्तेत आले आहे. राज्यात तर एकाच पक्षाचे सरकार ही बाब जुनी झाली आहे. अशा स्थितीत जिल्हा परिषदेत एक हाती सत्ता देण्यास मतदार राजा तयार नाही. मात्र आघाडी करताना आपण आपल्याशी वैचारिक बांधिलकी असलेल्या पक्षांशी आघाडी करुन त्यांच्यांशी सत्तेचा सारीपाट मांडणे हे आपण समजू शकतो. शेकापने राष्ट्रवादी व काँग्रेसशी आघाडी करताना हे पथ्थ पाळले होते. यावेळच्या जिल्हापरिषदेच्या निवडणुकीने शेकाप संपूर्ण जिल्ह्यात आहे हे दाखवून दिले आहे. गेल्या 25 वर्षानंतरशेकापचा प्रथमच पोलादपूर तालुक्यात जिल्हा परिषद सदस्य विजयी झाला आहे. रोह्यातही तब्बल 25 वर्षानंतर शेकापचा उमेदवार विजयी झाला आहे. येथून जिंकलेल्य पप्पूशेठ यांना आता उपाध्यक्षपद मिळाल्याने रोद्याला एक मोठे पद मिळाले. पोलादपूर तालुक्यात शेकाप व कॉग्रेसने शिवसेनेचा पराभव करुन पंचायत समिती प्रथमच ताब्यात घेतली आहे. पेणमध्ये शेकापचे पाचच्या पाचही जिल्हा परिषदेचे उमेदवार विजयी झाले आहेत. उरण पंचायत समितीमध्येही शेकापने जोरदार मुसंडी मारली आहे. पनवेल तालुक्यात जिकडे भाजपाचे जिल्हाध्यक्ष आहेत व त्यांनी भाजपला येथे शतप्रतिशत जिंकून आणण्याचे वचन दिले होते तेथे सहा ठिकाणी शेकापचे जिल्हा परिषदेचे सदस्य विजयी झाले आहेत. जिल्ह्यातील भाजपासाठी हा एक मोठा पराभवच म्हटला पाहिजे. महाड वगळता प्रत्येक तालुक्यात यावेळी शेकापचा जिल्हा परिषद सदस्य किंवा पंचायत समिती सदस्यतरी आहे. पाली, माणगाव, मुरुड येथेही शेकापला मिळालेला विजय नजरेआड करता येणार नाही. आता शिवतिर्थावर तरुणाई अवतरल्याने त्यांच्याकडून विकासाच्या संदर्भात मोठ्या अपेक्षा रायगडवासियांच्या आहेत. रायगड जिल्ह्यात बहुतांशी भागात रस्ते, पाणी या किमान पायाभूत सुविधा आहेत. आता त्यात आणखी चांगल्या सुविधा पुरविणे, सध्याच्या रस्त्यांची स्थीती सुधारणे, पर्यटन जिल्हा म्हणून विकसीत करण्यासाठी सुधारणा करणे या व अनेक बाबी कराव्या लागतील. शिवतिर्थावरील आता सत्तेत बसलेली तरुणाई अपेक्षांची पूर्तता करील यात काही शंका नाही.
---------------------------------------------------------------

0 Response to "शिवतिर्थावर तरुणाई"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel