-->
हिंदूंची लोकसंख्या वाढली

हिंदूंची लोकसंख्या वाढली

गुरुवार दि. 16 मार्च 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
------------------------------------------------
हिंदूंची लोकसंख्या वाढली
देशातील हिंदूंचे प्रमाण गेल्या चार दशकांमध्ये दुपटीने वाढले आहे. मात्र देशातील एकूण लोकसंख्येचा विचार केल्यास याच कालावधीत हिंदूंचे एकूण टक्केवारीतील प्रमाण घटले आहे. 1971 मध्ये देशामधील हिंदूंचे प्रमाण 45 कोटी 33 लाख इतके होते. 2011 च्या जनगणनेनुसार देशातील हिंदूंची संख्या 96 कोटी 62 लाखांवर पोहोचली आहे. 40 वर्षांमध्ये हिंदूंची संख्या वाढली आहे. मात्र एकूण लोकसंख्येतील हिंदूंचे प्रमाण घटले आहे. 1971 मध्ये देशातील हिंदूंचे प्रमाण 82.7 टक्के इतके होते. 2011 मध्ये हिंदूंचे एकूण लोकसंख्येतील प्रमाण 79.8 टक्के इतके झाले. याआधी 2015 मध्ये मोदी सरकारकडून देशातील धर्म आधारित लोकसंख्येची आकडेवारी जाहीर करण्यात आली होती. यानुसार 2001 ते 2011 या 10 वर्षांच्या कालावधीत मुस्लिम धर्मीयांच्या संख्येत चार कोटींपेक्षा अधिकची वाढ नोंदवण्यात आली होती. 2001 मध्ये देशातील मुस्लिमांची संख्या 13.8 कोटी इतकी होती. 2011 मध्ये ही संख्या 17.22 कोटींवर जाऊन पोहोचली. या काळात हिंदूंच्या लोकसंख्येतील वाढ ही मुस्लिम लोकसंख्येच्या वाढीपेक्षा कमी होती. जनगणना आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार 2011 च्या जनगणनेनुसार देशाची एकूण लोकसंख्या 121.09 कोटी इतकी आहे. यामध्ये हिंदूंचे प्रमाण 96.62 कोटी (79.8%), मुस्लिमांचे प्रमाण 17.22 कोटी (14.2%), ख्रिश्‍चन 2.78 कोटी (2.78%), शीख 2.08 कोटी (1.7%), बौद्ध 0.84 कोटी (0.7%), जैन 0.45 कोटी (0.4%) आणि अन्य धर्मीयांचे प्रमाण 0.79 कोटी (0.7%) इतके आहे. एकविसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत जगात मुस्लिम धर्मीयांची संख्या सर्वाधिक असेल, असा अंदाज अमेरिकन थिंक टँक प्यू रिचर्स सेंटरने काही दिवसांपूर्वीच व्यक्त केला होता. सध्याच्या घडीला जगभरात ख्रिश्‍चन धर्मीयांची संख्या सर्वाधिक आहे. 2010 पर्यंत जगभरातील मुस्लिमांची संख्या 1.6 अब्ज इतकी होती. हे प्रमाण जागतिक लोकसंख्येच्या 23 टक्के इतके होते. सध्या मुस्लिम धर्मीयांची संख्या ख्रिश्‍चन धर्मीयांपेक्षा कमी आहे. मात्र लोकसंख्येचा विचार केल्यास मुस्लिम धर्म जगातील सर्वात वेगाने वाढणारा धर्म आहे, असे या अहवालात म्हटले होते. 2050 च्या अखेरपर्यंत मुस्लिमांची संख्या सर्वाधिक असलेल्या देशांच्या यादीत भारताचा क्रमांक पहिला असेल. 2050 वर्ष संपताना भारतात तब्बल 30 कोटी मुस्लिम असतील. सध्या सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेल्या देशांच्या यादीत भारत दुसर्‍या क्रमांकावर आहे. मात्र येत्या 34 वर्षांमध्ये भारत इंडोनेशियाला मागे टाकेल,असे यात म्हटले होते. कोणत्याही धर्मीयातील लोकसंख्या वाढीचा थेट संबंध हा शिक्षणावर आहे. ज्या समाजात शिक्षण जास्त तेथे मुलांचे प्रमाण कमी होत गेले आहे. हिंदूंची लोकसंख्या कमी होण्याचे हेच मुख्य कारण आहे.
--------------------------------------------------------------

0 Response to "हिंदूंची लोकसंख्या वाढली"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel