-->
कमळाची एकाधिकारशाही

कमळाची एकाधिकारशाही

रविवार दि. 12 मार्च 2017च्या पान 1 साठी विशेष संपादकीय 
------------------------------------------------
कमळाची एकाधिकारशाही
पाच राज्यातील जाहीर झालेले निकाल पाहता नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाची घोडदौड वेगाने सुरु आहे, हेे स्पष्टच आहे. 2012 साली सत्तेत आल्यानंतर भाजपासाठी व मोदींसाठी वैयक्तिकरित्या झालेला हा सर्वात मोठा विजय म्हटला पाहिजे. कारण सत्तेत आल्यावर त्यांना दिल्लीत मोठा पराजय सहन करावा लागला होता. मात्र त्यानंतर बिहारचाही मोठा झटका बसला होता. तामीळनाडू, पश्‍चिम बंगाल, केरळ या राज्यातही भाजपाच्या हाती फारसे काही लागले नव्हते. त्यामुळे देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तरप्रदेशावर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. खरे तर केंद्रातील पावणे तीन वर्षाची भाजपाची कारकिर्द पाहता, फारसे काही लोकांच्या हातात पडलेले नाही, अच्छे दिन तर दूरच राहो केवळ आश्‍वासनांवरच विश्‍वास ठेवावा लागत आहे, अशी स्थिती असतानाही    उत्तरप्रदेशातील जनतेने सर्वात मोठे बहुमत दिले आणि भाजपाचा 14 वर्षाचा वनवास संपविला आहे. समाजवादी पार्टी-कॉग्रेस यांची आघाडी तर दुसरीकडे मायावती यांचा धीमेगतीने पण निश्‍चयाने चालणारा हत्ती हे सर्व निष्फळ ठरल्याचे दिसले. विरोधकांना अनपेक्षित असाच हा निकाल होता. उत्तरप्रदेशात बिहारसारखा प्रयोग काही यशस्वी होऊ शकला नाही. 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला 44 टक्के मते पडली होती. ही टक्केवारी कायम राखण्यात मोदींना यश आले. भाजपाने तर राज्यात 800 हून जास्त सभा घेतल्या होत्या. पंतप्रधान तर वाराणसीत तीन दिवस तळ ठोकून होते. तसेच सर्व मिडिया आपल्या खिशात घालण्यापासून ते बाहेरुन उमेदवार आयात करण्यापर्यंतचे सर्व प्रयत्न भाजपाने केले. खरे तर नोटाबंदीमुळे जनता हैराण झाली होती आणि याचा फायदा विरोधकांना मिळेल हा अंदाज खोटा ठरला. भाजपाने गेल्या पावणे तीन वर्षात अच्छे दिन जनतेला दाखविले नसले तरीही जनतेने सध्या तरी भाजपावर विश्‍वास दाखविला आहे ही वस्तुस्थिती नाकारण्यात काहीच अर्थ नाही. मात्र या निकालामुळे कमळाची एकाधिकारशाहीकडे वाटचाल सुरु झाली आहे, असे म्हटल्यास काही वावगे ठरु नये.  गेल्या लोकसभेत भाजपाला सर्वधिक जागा देऊन जनतेने निवडून दिले. गेल्या तीस वर्षात प्रथमच एकाच पक्षाचे बहुमत असलेले सरकार सत्तेत आले. या लोकसभेत विरोधकांची संख्या एवढी नगण्य आहे की विरोधक जवळपास अस्तित्वातच नाहीत, अशी स्थिती आहे. आता देशातील सर्वात मोठ्या राज्यात उत्तरप्रदेशात तशीच स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येथे सत्तेत असलेल्या भाजपाची पावले एकाधिकारशाहीकडे वळल्यास त्यात काही आश्‍चर्य वाटता कामा नये. एकाधिकरशाही मग ती राजकीय असो वा उद्योगात आपल्यासारख्या लोकशाही देशाला ती परवडणारी नाही. याच एकाधिकारशाहीतून अनेकांचा शेवट झाला आहे, हा इतिहास आहे. भाजपाच्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन करताना त्यांची पावले एकाधिकारशाहीकडे वळू नयेत हीच सदिच्छा व्यक्त करुया.
----------------------------------------------------------------------

0 Response to "कमळाची एकाधिकारशाही"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel