-->
गोव्यातील राजकीय  शिमग्याचे शिल्पकार

गोव्यातील राजकीय शिमग्याचे शिल्पकार

मंगळवार दि. 14 मार्च 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
------------------------------------------------
गोव्यातील राजकीय 
शिमग्याचे शिल्पकार
गोव्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून 17 जागा जिंकून कॉग्रेस सर्वात मोठा पक्ष असला तरी राजकीय शिमगा करुन गोव्यात केवळ 13 जागा जिंकूनही भाजपाने सत्तास्थानी उडी मारील आहे. गोव्यातील या राजकीय शिमग्याचे शिल्पकार आहेत माजी मुख्यमंत्री व संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर. यापूर्वी दोन वेळा गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी राहिलेले पर्रिकर दिल्लीतील वातावरण कधीच रमले नाहीत. त्यामुळेच ते दर शनिवार-रविवार गोव्याचा रस्ता धरीत. संरक्षणमंत्रीपदी हे देशाच्या राजकारणातील दिल्लतील तिसरे मोठे पद असले तरीही त्यांना नेहमीच गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी राहाण्यात रस होता, याची खंत त्यांनी अनेकदा व्यक्तही केली होती. परंतु संघाच्या शिस्तित वाढलेले मनोहरराव पक्षाचा आदेश झुगारुन काही पुन्हा पणजीत येऊ शकत नव्हते. मात्र नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांना पुन्हा गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची संधी चालून आली व त्यांनी तेवढ्याच उत्साहाने ती जबाबदारी स्वीकारलीही. खरे तर एकदा का केंद्रात गेले की त्यांना राज्यातील राजकारणात रस नसतो. कारण दिल्लीचे राजकारणच काही और आहे. तिथे जो टिकला तो खरा राजकारणी झाला असे म्हटले जाते. मात्र गोव्याच्या पर्रिकर त्यांना दिल्लीच्या राजकारणात कितीही मोठी संधी मिळाली तरीही त्यांचा एक डोळा हा गोव्यावर असायचा. त्यामुळे ते गोव्यात संधी मिळताच पुन्हा एकदा टूकर पणजीत रुजू झाले आहेत. गोव्यात यावेळी कॉग्रेसला यावेळी 17 जागा मिळून तो सर्वात मोठा पक्ष होता. राज्यपालांनी त्यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करण्याची आवश्यकता होती. परंतु सर्वच संकेत पायदळी तुडविणार्‍या भाजपाला गोव्यात कोणत्याही परिस्थीतीत सत्ता पाहिजेच होती. त्यामुळे त्यांनी सर्व सोपस्कार घाईत आटोपले व पर्रिकरांना गोव्यात जाऊन सत्तेची समिकरणे जुळविण्यास सांंगितले. पर्रिकर त्यात हुषार आहे व गोव्याच्या राजकारणाची नस अन नस ओळखतात त्यामुळे अन्य पक्षांनीही पर्रिकर येणार असतील तर आम्ही भाजपाला पाठिंबा देऊ असे सांगितले. यात कॉग्रेस पिछाडीवर पडली. विधीमंडळ नेता निवडण्यासाठीही त्यांना 24 तास कमी पडले. यात अन्य पक्षांनी कॉग्रेसपेक्षा भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. मात्र राज्यपालांनी जर कॉग्रेसला सर्वात प्रथम आमंत्रित केले असते तर आज भाजपाबरोबर गेलेले पक्ष त्यांच्या सोबतीला आले असते हे वास्तव विसरता येणार नाही. त्यामुळे केंद्रात ज्याचे सरकार असते तो पक्ष गोव्यासारख्या छोट्या राज्यात सत्तेची समिकरणे सहज जुळवू शकतो, हे पुन्हा एकदा सिध्द झाले. यात कसले लोकशाहीचे संकेत आणि नियम, सत्ता मिळविणे महत्वाचे आहे, हा नियम भाजपाने पाळला आहे. गोव्याचे मावळते मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना निवडणूक जिंकता आली नाही. मुख्यमंत्र्यांबरोबर भाजपाचे पाच मंत्री पराभूत झाले आहेत. तसेच त्यांचे सध्या असलेले 21 सदस्यांचे बळ 13वर खाली आले. याचा अर्थच स्पष्ट आहे की, गोव्यातील जनतेने भाजपाला सत्ता ग्रहण करण्याच्या बाबतीत कौल दिलेला नाही. तसा कौल त्यांनी कोणत्याच पक्षाला दिलेला नाही हे देखील वास्तव आहे. मात्र कॉग्रेस हा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे, त्यामुळे सत्ता स्थापनेचा दावा करण्याचा त्यांचा पहिला अधिकार आहे. भाजपाबरोबर आज जे पक्ष पाठिंब्यासाठी पुढे आले त्यांच्यांशी काही निवडणूक पूर्व आघाडी भाजपाने केली नव्हती. तशी जर त्यांची आघाडी असती तर त्यांचा सत्ता स्थापनेचा दावा पहिला राहिला असता. परंतु तसे काही झाले नाही. थेट पर्रिकर यांना आमंत्रण राज्यपालांनी दिले. पाच वर्षांपूर्वी काँग्रेसचे अवघे नऊ आमदार निवडून आले होते. आता ती संख्या जवळपास दुपटीवर नेण्यात पक्षाला यश आले आहे. गोव्याचे काँग्रेसचे केंद्रीय निरिक्षक दिग्विजयसिंह गोव्यात ठाण मांडून बसले होते. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष व गोवा फॉरवर्डचे प्रत्येकी तीन आमदार निवडून आले असल्याने सत्तेच्या चाव्या त्यांच्याकडे होत्या. यात भाजपाने बाजी मारली. परंतु त्यांनी हे लक्षात ठेवावे की, जनमताच्या कौलाचा त्यांनी अपमान केला आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष भाजपसोबत सत्तेत सहभागी होता. सरकार पाच वर्षे पूर्ण करत असतानाच सत्तेत सहभागी असताना त्यांनी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याविरुद्ध थेट बंडाचा झेंडा उभारला. आता पर्रिकर असले तर आम्ही पाठिंबा देऊ अशी त्यांनी भूमिका घेतली. गोवा फॉरवर्ड हा खरे तर काँग्रेसच्या जवळचा पक्ष. पण निवडणुकीपूर्वी जागावाटपावरून काँग्रेसने ऐनवेळी घात केल्याचा आरोप आहे. मगोपप्रमाणेच स्बळावर त्यांनी निवडणूक लढवली. चारपैकी तीन उमेदवार निवडून आले. ते तिघे नक्की पाठिंबा देतील, असा काँग्रेसला विश्‍वास वाटत होता. पण गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांनी काही दिवसांपूर्वी, गोव्याच्या भल्यासाठी मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री व्हायला हवेत, असे म्हटले होते. भारतीय जनता पक्षाच्या गोव्यातल्या घसरणीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित गोवा सुरक्षा मंच कारणीभूत ठरला आहे. भाजपसमोर मंचाने कडवे आव्हान उभे केले होते. गोसुमंचे नेते सुभाष वेलिंगकर यांनी आक्रमकपणे प्रचार करून भाजप आणि विशेषतः मनोहर पर्रीकर यांच्यावर टीकेची राळ उडवली होती. त्यांनी पर्रीकरांची खोटारडे अशी संभावना केली होती. गोसुमं आणि शिवसेना यांच्या संयुक्त प्रचारसभांना हजारोंच्या संख्येने लोकांनी हजेरी लावली. पण ती गर्दी मतांमध्ये रूपांतरित झाली नाही. गोसुमंचा एकही उमेदवार विजयी झाला नाही, तरी भाजपचे उमेदवार पडायला गोसुमं कारणीभूत ठरला. गोव्यात सध्या जनमताचा कौल डावलून भाजपाने राजकीय शिमगा करुन सत्ता ग्रहण केली आहे. सत्ता टिकविताना पर्रिकरांची कसोटी लागेल परंतु ते व्यक्तिश: गोव्यात परतल्यामुळे खूष आहेत.
-----------------------------------------------------------------

0 Response to "गोव्यातील राजकीय शिमग्याचे शिल्पकार"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel