-->
सत्तेची समिकरणे आणि फुललेले कमळ

सत्तेची समिकरणे आणि फुललेले कमळ

विवार दि. 26 फेब्रुवारीच्या मोहोरसाठी लेख
------------------------------------------------------
सत्तेची समिकरणे आणि फुललेले कमळ
--------------------------------------------------------
एन्ट्रो- आजवर कॉँग्रेस पक्षाकडे सत्ता असतानाही त्यांनी एवढा पैसा खर्च केला नव्हता, तेवढा पैसा मोदींनी म्हणजेच भाजपाने उभारला व खर्च करुन सत्ता खेचून आणली. केवळ पैशाने मते खरेदी करता येत नाहीत हे समिकरण सत्य असले तरी सध्याच्या काळात निवडणूक जिंकण्यासाठी पैसा हा लागतोच. त्यामुळे पैसा कुठेच कमी पडणार नाही याची दखल मोदींनी लोकसभेच्या निवडणुकीत घेतली आणि विजयश्री खेचून आणण्यासाठी एक पॅटन तयार केला. हाच पॅटर्न त्यांनी लोकसभेपासून ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दामटून रेटला आहे...
------------------------------------------------
तेरा वर्षापूर्वी म्हणजे 2004 साली केंद्रात कॉँग्रेसच्या नेतृत्वाखाली सरकार आले त्यावेळी त्यांना सर्वात प्रथम डाव्या पक्षांनी पाठिंबा दिला होता. मात्र दुसर्‍यावेळी 2009 साली स्वबळावर सोनिया गांधी व डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखाली कॉँग्रेसचे पुन्हा सरकार आले त्यावेळी भाजपा हा अतिशय कमकुवत झालेला पक्ष होता. त्यावेळी भाजपाचे नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा पराभवाने पूर्णपणे खचलेला होता. यातून भाजपा कसा तगणार अशी चिंता वाटत असताना पुढील पाच वर्षात भाजपाने सत्तेच्या दारात पाऊल टाकले. दुसर्‍यांदा ज्यावेळी पुन्हा कॉँग्रेस सत्तेत आली त्यावेळी भाजपाच्या अनेक नेत्यांनी निवडणूकीच्या मतदान यंत्रात कॉँग्रेस काही गडबडी करीत असल्याचा आरोप केला होता. अर्थात यात काहीच तथ्य नव्हते. ही त्यावेळची भाजपाची नैराशातून उमटलेली प्रतिक्रिया होती. आता अशीच प्रतिक्रीया नैराश्येपोटी कॉँग्रेसचे नेते काढीत आहेत, याचे मोठे आश्‍चर्य वाटते. मात्र काळाच्या ओघात भाजपाचे नैराश्य झटकले गेले. यामागे नरेंद्र मोदी यांनी घेतलेली मेहनत, प्रचारात नवीन तंत्रज्ञानाचा केला वापर, कॉँग्रेसच्या विरोधात केलेला आक्रमक प्रचार, कॉँग्रेसच्या नेत्यांवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप, खोटे असले तरी ते दामटून बोलायचे म्हणजे खरे वाटते हे सुत्र भाजपाने आखले, यातून भाजपाला बळ मिळत गेले. मोदींच्या मागे अदानींपासून अंबानीपर्यंत तसेच अनेक भांडवलदारांची फळी थैल्या घेऊन उभी राहिली होती. अगदी भांडवलदारांपासून ते सर्वसामान्य लोकांपर्यंत सर्वांना कॉँग्रेसची सत्ता जावी असेच वाटत होते. सलग दोन वेळा सत्ता उपभोगल्यामुळे कॉँग्रेसमध्ये एक प्रकारचा सुस्तपणा आला होता. त्यामुळे त्यांना सत्तेतून काही काळ दूर ठेवणे आवश्यक वाटू लागले होते. त्यात मोदींनी जनतेची ही नाडी ओळखून प्रचार केला व त्यात त्यांना यश आले. आजवर कॉँग्रेस पक्षाकडे सत्ता असतानाही त्यांनी एवढा पैसा खर्च केला नव्हता, तेवढा पैसा मोदींनी म्हणजेच भाजपाने उभारला व खर्च करुन सत्ता खेचून आणली. केवळ पैशाने मते खरेदी करता येत नाहीत हे समिकरण सत्य असले तरी सध्याच्या काळात निवडणूक जिंकण्यासाठी पैसा हा लागतोच. त्यामुळे पैसा कुठेच कमी पडणार नाही याची दखल मोदींनी लोकसभेच्या निवडणुकीत घेतली आणि विजयश्री खेचून आणण्यासाठी एक पॅटन तयार केला. हाच पॅटर्न त्यांनी लोकसभेपासून ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दामटून रेटला आहे. हा पॅटन सध्या तरी यशस्वी झाल्याचे दिसते. अर्थात हा पॅटर्न नेहमीच यशस्वी होईल याची हमी देता येणार नाही. या पॅटर्नमध्ये सध्या कमळ फुलले आहे, अर्थात फुललेले कमळ हे कधी तरी कोमेजणार आहेच. कारण यापुढे भाजपाला जनतेला दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता केल्याचे दाखवायचे आहे. त्यांनी जर तसे केले नाही तर जनता त्यांना घरी बसविणार आहे, म्हणजेच कमळ कोमेजणार आहे. लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीत भाजपाचा हा मोदी पॅटर्न यशस्वी झाला हे मान्यच करावे लागेल. यात त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना फोडून आपली ताकद वाढविली. ज्या स्थानिक नेत्यांना सत्ता पाहिजे होती व यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार पुन्हा काही येत नाही याची काणकूण लागली होती त्यांनी एका रात्रीत पक्ष बदलला आणि भाजपाच्या कळपात उडी घेतली. आपला पक्ष मजबूत करण्यासाठी भाजपाला अशी माणसे हवीच होती. कारण स्वबळावर सत्ता येण्याएवढी आपली ताकद नाही याची त्यांना पूर्ण कल्पना होती. मात्र अशा प्रकारे उसने पहलवान घेऊन त्यांना या लढाईत उतरुन काहीही करुन बाजी मारायचीच होती. पक्षात येणारे लोक किती स्वच्छ आहेत याची त्यांना कल्पना नव्हती असे म्हणणे चुकीचे ठरेल.  मात्र आता तर आपण त्यांना दाखल करुन घेऊ पुढचे पुढे बघु अशी त्यांची धारणा होती. हा देखील त्यांचा सत्ता काबीज करण्याचा डाव सहज यशस्वी झाला. त्यानंतर फडणवीस सरकारने थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची शक्कल लढवून आपल्या जागा किती जास्त येतील ते पाहिले. हा त्यांचा गेम यशस्वी झाला असला तरी भविष्यात नगरपालिकाच्या कामकाजात मोठे अडथळे निर्माण होणार आहेत. कारण अनेक ठिकाणी नगराध्यक्ष भाजपाचा व बहुमत अन्य पक्षाचे अशी स्थिती आहे. त्यानंतर आलेल्या जिल्हा परिषदा व पंचायत समितींच्या निवडणुकीत त्यांनी धनशक्तीचा पुरेपूर वापर करुन आपल्याला कशा जास्त जागा मिळतील ते पाहिले. केंद्रापासून ते राज्यात सत्ता असली की अनेक गोष्टी सोप्या जातात, हे देखील खरे आहे हे यावेळच्या निवडणुकीने भाजपाने सर्वांना दाखवून दिले. अनेक ठिकाणी त्यांनी आपली पित्रृसंघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेच्या स्वयंसेवकांनाही तिकीटे नाकारली. आता सत्ता गाजविताना व सत्तेचा विस्तार करताना त्यांना संघाची शिकवणूक नको आहे, तसे केल्यास त्यांची अधोगती सुरु होईल, असे त्यांना वाटते. सत्तेची समिकरणे संघांच्या इशार्‍यावरुन मांडली व साधनसुचिता पाळली तर भाजपा वाढू शकणार नाही, अशी ठाम समजूत भाजपाची आहे. निवडणुकीच्या राजकारणात तडजोडी या कराव्याच लागतात, परंतु अगदी खालच्या थराला जाऊन जर या तडजोडी केल्या तर पुढे सत्ता राबविणे कठीण जाते हे सत्य भाजपाला पुढील काळात समजेल. आज भाजपा राज्यात सर्वात मोठा पक्ष झाला आहे, याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचे अभिनंदन केलेच पाहिजे. या यशाचे बहुतांशी श्रेय फडणवीसांकडेच जाते. मात्र आता पुढील काळात निवडणुकांच्या समिकरणांचा हिशेब मांडताना त्यांची कसोटी लागणार आहे. फुललेल्या कमळाचा ताजेपणा टिकवायचा असेल तर लोकांची कामे करावी लागणार आहेत, हे विसरता कामा नये. भाजपाची कॉँग्रेस कधीच झाली आहे. मात्र कॉँग्रेससारखी दयनीय अवस्था होऊ नये यासाठी सत्ता डोक्यात भिनता कामा नये.
-----------------------------------------------

0 Response to "सत्तेची समिकरणे आणि फुललेले कमळ"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel