-->
अँम्बेसिडरचा चालक बदलला

अँम्बेसिडरचा चालक बदलला

संपादकीय पान मंगळवार दि. 14 फेब्रुवारी 2017 च्या अंकासाठी अग्रलेख 
--------------------------------------------
अँम्बेसिडरचा चालक बदलला 
एकेकाळी मोटार मालक, टॅक्सीचालक, सिनेस्टार पासून ते पंतप्रधान यांच्यासाठी वाहनाचे साधन असणारी अँम्बेसिडर मोटार ही काळाच्या ओघात संपुष्टात येऊन तीन वर्षे लोटली, मात्र आता या ब्रँडची मालकी असणार्‍या सी. के. बिर्ला समूहाने अँम्बेसिडर हा ब्रँड आता फ्रेंच कंपनी पिज्याँला 80 कोटी रुपयांना विकला. त्यामुळे आता अँम्बेसिडरचा चालक बदलल्याने हा एतिहासिक मोटारीचा ब्रँड पुन्हा एकदा बाजारात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सुमारे सात दशकांपूर्वी अँम्बेसिडरचे उत्पादन सुरु झाले. त्यावेळी त्यांना कोणच स्पर्धक नव्हता. त्यामुळे त्यांची मोटार निर्मीतीत मक्तेदारीच होती. असे असले तरी त्यातून प्रवास करणे म्हणजे शान असायची. 1980 साली मारुती मोटार्सने आपले पहिले उत्पादन मारुती 800 बाजारात आणल्यावर अँम्बेसिडरला खरी स्पर्धा करावी लागली. मारुतीच्या स्पर्धेत ही लोकप्रिय मोटार काही टिकाव धरु शकली नाही व तिची अधोगतीच सुरु झाली. 80 साली त्यांचे वार्षिक 24 हजार मोटारींचे उत्पादन होते ते 2014 साली हा प्रकल्प बंद होताना जेमतेम 2,439 मोटारींवर खाली आले. मारुतीच्या पाठोपाठ जगातील अनेक नामवंत वाहन उत्पादन कंपन्या भारतात आल्या व त्यांनी आपला बाजारपेठेतील हिस्सा वाढवत नेला. तर दुसरीकडे अँम्बेसिडरचे आपले उत्पादन कमी होत चालले होते. स्पर्धेच्या युगात ही कंपनी काही टिकाव धरु शकली नाही. अँम्बेसिडरने सुरुवातीला जे मॉडेल बाजारात आणले होते तेच बहुतांशी शेवटपर्यंत तसेच ठेवले. त्या तुलनेत अनेक नवनवीन मोटारींची मॉडेल्स बाजारात आली. बदलत्या काळानुसार आपल्यात बदल करण्यात ही कंपनी मागे पडली. केवळ इतिहासातच जगणे त्यांनी पसंत केले. याचा परिणाम असा झाला की, कोलकत्यातील त्यांचा प्रकल्प ओस पडू लागला. एकेकाळी या मोटारीला भारताची रोल्स रॉईस असे संबोधले गेले होते. परंतु खर्‍या रोल्स रॉईस प्रमाणे ही काही घोडदौड करु शकली नाही ही दुदैवी बाब म्हटली पाहिजे. पिज्यॉ या फ्रेंच मोटार कंपनीला भारतात आपले उत्पादन सुरु करावयाचे आहे. यापूर्वी त्यांनी प्रिमीयर ऑटोमोबाईल्स सोबत करार करुन आपले उत्पादन बाजारात आणले होते. मात्र त्यांचा हा प्रयोग फसला. आता त्यांनी पुन्हा एकदा अँम्बेसिडर ताब्यात घेऊन भारतीय मोटार वाहन उद्योगात नशिब आजमावयचे ठरविले आहे. आता ते काय करतात व कितपत यशस्वी होतात ते पहायचे. आता बहुदा अँम्बेसिडर मोटार त्यांच्यामळे पुन्हा भारतीय रस्त्यावरुन धावू लागेल, असे दिसते.
-------------------------------------------------------------------------


0 Response to "अँम्बेसिडरचा चालक बदलला "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel