-->
नवाझ शरिफ यांचे नक्राश्रू

नवाझ शरिफ यांचे नक्राश्रू

संपादकीय पान सोमवार दि. २६ सप्टेंबर २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------- 
नवाझ शरिफ यांचे नक्राश्रू
उरी येथील भारतीय लष्करी तळावरील हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत काश्मीर प्रश्‍नावरून आळवलेला भारतविरोधी राग म्हणजे नक्राश्रू ठरावेत. उरी येथील झालेला हल्ला हा पाकिस्तानपुरस्कृत आहे, तो अतिर्‍यांनी केला असल्याचे सांगून पाकिस्तान आपली जबाबदारी झटकू शकत नाही. अशा वेळी शरीफ हे एखाद्या शरीफ माणसाप्रमाणे आपण आहोत व काश्मिरांच्या स्वयंनिर्णयाबाबत लढत असल्याची भूमिका घेत आहेत. पाकच्या या दहशतवादी कारवायांना जगातून विरोध होत आहे. चीन हा आपला मित्र असल्याचे वरकरणी दिसत असले तरी संयुक्त राष्ट्र सभेमध्ये चीनने भारताच्या बाजूने नेहमीच कौल दिलेला आहे, हे कधी विसरता येणार नाही. काश्मीर प्रश्‍न सुटल्याशिवाय भारत आणि पाकिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित होणार नाही, हे शरीफ यांचे म्हणणे त्यांना शांतता नकोच असावी, हे दर्शवते. काश्मीर हा द्विपक्षीय विषय आहे. तो संबंधित दोनच राष्ट्रांनी चर्चेच्या माध्यमातून सोडवायचा विषय आहे, ही भारताची आजवरची स्पष्ट भूमिका आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल यांच्यापासून भारताने ही भूमिका घेतली आहे व वारंवार त्यासाठी चर्चेसाठी पाकला आमंत्रित केले जाते. परंतु पाकच त्यासंबंधी गंभीर नाही असे दिसते. हा प्रश्‍न दोन्ही राष्ट्रंनी एकत्र बसून सोडवायचा आहे. मात्र असे असतानाही वेळोवेळी पाकिस्तान  हा प्रश्‍न आन्तरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडत आला आहे. हे खरे या दोन्ही देशात ठरत आलेल्या सांमजस्यांच्या भूमिकेचे उल्ल्ंघन आहे. आमसभेतील वीस मिनिटांच्या भाषणाचा बहुतांश भाग नवाझ शरीफ यांनी काश्मीरवर बोलण्यात खर्ची केली. अर्थात त्यातून सगळे अंतर्विरोध समोर आले. उरीतील हल्ल्याचा साधा उल्लेखही त्यांनी केला नाही; पण त्याच वेळी काश्मीरमध्ये मारला गेलेला हिज्बुल मुजाहिदीनचा दहशतवादी बुर्‍हाण वाणी याचा उल्लेख करताना त्याला काश्मीरचा हीरो असे संबोधले. अशा प्रकारची वक्तवे करुन आपण भारतास उचकावित आहोत याची शरीफ यांना कल्पना नाही काय? निश्‍चितच आहे. मात्र पाकला शांततेत नांदायचे नाही. पाकिस्तानातील लष्कर व राज्यकर्ते हे दोघे एकमेकांच्या हातात हात घालून राज्य करीत आहेत व भारताच्या संबंधी त्यांची भूमिका फारशी वेगळी नाही. चर्चेच्या फक्त फेर्‍या झाडायच्या आणि त्यानंतर आपल्याला जे पाहिजे तेच करायचे असे पाकचे नेहमी वर्तन असते. आता देखील त्याहून वेगळे काहीच नाही. यासाठी भारताने आता चोख उत्तर देण्याची गरज आहे. नाही तर नरेंद्र मोदी यांनी पाकला चांगला धडा शिकविण्याची भाषा नेहमीच केली होती व त्यावर मते पदरा पाडून घेतली होती. आता त्यांनी आपला हा शब्ध खरा करुनच दाखवावा. किस्तानने गांभीर्याने समजून घ्यायला हवा. बलुचिस्नातील सध्याच्या पाक राज्यकर्त्यांनी तेथील रहिवाशांवर अन्याय केले आहेत व त्यामुळे ते कंटाळून आपले स्वतंत्र्य अस्तित्व मागत आहेत, याला भारताचा यापूर्वी छुपा पाठिंबा होता. आन्तरराष्ट्रीय राजकारणाचा तो एक भाग होता. आता मात्र भारताने उघड पाठिंबा दिला आहे. त्यामुळे पाकचे लष्कर व राज्यकर्ते दोघेही खवळळे आहेत. बलुच, शिया, हिंदू, ख्रिश्‍चन आदी अल्पसंख्याकांवर दिवसाढवळ्या अत्याचार होत असूनही सगळे आलबेल असल्याचे दाखविण्याची शरीफ यांची केविलवाणी धडपड होती. अण्वस्त्रांच्या संदर्भात स्वतःची जबाबदारी झटकून टाकत भारताकडे बोट दाखवून ते मोकळे झाले. वास्तविक उरी येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर पाकपुरस्कृत दहशतवादाचा मुद्दा केवळ भारताताच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही पुन्हा चर्चिला जात असताना आणि भारतात त्याबाबत तीव्र स्वरूपाचा जनक्षोभ असताना नवाज शरीफ मात्र काश्मिरींच्या स्वयंनिर्णयाबाबत आग्रह धरून भारताच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न करतात, हे संतापजनक आहे. शरीफ यांनी आमसभेतील त्यांच्या भाषणाची सुरवात शीतयुद्धोतर काळातील जागतिक स्थिती, बड्यांची सत्तास्पर्धा, युरोप व आखातातील स्थिती, जगापुढची आर्थिक आव्हाने अशा विविध मुद्यांना स्पर्श करत केली; पण तो केवळ देखावा होता. दहशतवादाचे चटके पाकिस्तानलाही बसताहेत हे खरे; परंतु त्यापासून पाकिस्तानी राज्यकर्ते काही बोध घ्यायला तयार नाहीत. हे जर त्यांना चटके जाणवत आहेत तर ते दुसरीकडे दहशतवाद पोसतही आहेत. दहशतवाद हा चांगला व वाईट असूच शकत नाही. दहशतवाद हा वाईटच आहे. हाफिज सईद, मौलाना मसूद अझहर, दाऊद इब्राहिम यांना आश्रय देणारे पाकिस्तानी राज्यकर्तेच आहेत, पण नवाज शरीफ यांनी त्याबद्दल मात्र चकार उल्लेख केलेला नाही. बुर्‍हाण वणीला हुतात्मा ठरवण्याची भाषा करण्याचे धारिष्ट्य त्यांनी आन्तरराष्ट्रीय व्यासपीठावरुन केली आहे. काश्मीरमध्ये भारतीय लष्कराची दडपशाही चालू आहे, हजारो काश्मिरींवर अत्याचार सुरू आहेत, असे अश्रू ढाळत असाताना शरीफसाहेब खुद्द त्यांच्याच देशातील बलुचिस्तानधील स्थितीवर भाष्य करण्याचेही ते टाळतात. अफगाणिस्तानातील स्थिती, अण्वस्त्रांचा वापर यांदर्भातील पाकच्या भूमिकेविषयी शरीफ यांनी मांडलेली भूमिका वास्तवाशी फारकत घेणारी आहे. शरीफ यांच्या आमसभेतील भाषणाचे तीव्र पडसाद भारतात उमटणे साहिजकच आहे. भारताच्या वतीने येथे भाषण करणार्‍या परराष्ट्र खात्यातील सचिवांनी हे सर्व मुद्दे जरुर खोडून काढले असले तरीही पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्याची हीच योग्य वेळ आहे. याबाबत भाजपा व मोदी मवाळ भूमिका का घेतात याचे आश्‍चर्य् वाटते. कॉँग्रेसवर ते याबाबतीत सडकून टीका करीत. मग आता सत्ताधारी असताना ते गुळमुळीत भूमिका घेत आहेत?
--------------------------------------------------------------------------

0 Response to "नवाझ शरिफ यांचे नक्राश्रू"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel