-->
ग्राहक हाच राजा

ग्राहक हाच राजा

संपादकीय पान शनिवार दि. २ एप्रिल २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
ग्राहक हाच राजा
सरकारने आता ऑनलाईन सवलती देणार्‍या कंपन्यांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सवलती देण्यावर निर्बंध घातले आहेत. सरकारच्या म्हणण्यानुसार, ऑनलाईन व ऑफलाईन कंपन्यांना समान पातळीवर व्यवसाय करता यावा यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. मात्र या सरकारी धोरणामुळे ग्राहकांची निराशा निश्‍चितच होणार आहे. अर्थातच या कंपन्यांनी कमी किंमती माल विकावा हा त्यांचा प्रश्‍न आहे. स्पर्धेच्या या युगात अशा प्रकारे ग्राहकांना भुलविण्यासाठी विविध सवलती दिल्या जातात. त्यावर सरकारने निर्बंध लादून ग्राहकांची निराशा करु नये. सध्याच्या काळात ग्राहक हाच या बाजारपेठेचा राजा आहे व त्याला स्पर्धेचा फायदा मिळून स्वस्तात माल विळविणे हा त्यांचा हक्क आहे. पारंपारिक कंपन्यांना आता ऑनलाईन विक्री करणार्‍या कंपन्यांची मोठी स्पर्धा आहे व त्या स्पर्धेत ऑफलाईन कंपन्यांचा टिकाव धरण्यासाठी त्यांनीही ऑनलाईन कंपन्यांप्रमाणे सवलती द्याव्यात. परंतु सरकारने त्यांना संरक्षण देण्यासाठी पावले उचलू नयेत. एवढे करुनही ऑनलाईन कंपन्या काही ना काही तरी युक्ती लढवून ग्राहकांना सवलती देणारच आहेत. कारण या कंपन्या किमतीत थेट सवलत नसली तरी, अन्य ऑफर व कॅशबॅकसारख्या मार्गाने कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्याचे प्रयत्न करतीलच. नव्या धोरणानुसार ई-कॉमर्स कंपन्यांना एकूण विक्रीमध्ये विशिष्ट कंपनीच्या उत्पादनांचे प्रमाण २५ टक्क्यांपर्यंतच ठेवण्याची मुभा राहील. परिणामी, ई-कॉमर्स कंपन्यांना विक्री धोरणात आवश्यक बदल करावे लागतील. गेल्या काही वर्षांत ग्राहकांना घरबसल्या खरेदीचे पर्याय देऊन ई-कॉमर्स कंपन्यांनी ग्राहकोपयोगी वस्तूंच्या बाजारपेठेचे स्वरूपच बदलले आहे. ई-कॉमर्स कंपन्यांनी मोठ्या सवलती दिल्याने ग्राहकांचा, विशेषतः तरुणाईचा ऑनलाइन खरेदीकडे ओढा वाढला. सुरुवातीला ई कॉमर्सचा हा व्यवसाय एवढा वाढेल याची कोणालाच कल्पना नव्हती. मात्र स्वस्तात वस्तू विकून या कंपन्यांना ग्राहकांना आपल्याकडे खेचून घेतले आहे. सरकारने आता मल्टिब्रँड क्षेत्रातील कंपन्यांना तसेच रिटेल उद्योगात १०० टक्के विदेशी भांडवल आमंत्रित करण्यासाठी आपले दरवाजे खुले केले आहेत. विरोधी पक्षात असताना विरोध करणारा हाच भाजपा आता मात्र विदेशी भांडवलाचे स्वागत करुन अनेक क्षेत्रए खुले करीत सुटला आहे. भाजपाच्या धोरणातील हा शिथीलपणा कशामुळे आला याचा विचार झाला पाहिजे. किंवा विरोधात असताना त्यांनी केवळ विरोधासाठी विरोध केला असावा असेच दिसते. विदेशी भांडवलाचे स्वागत हे झालेच पाहिजे. मात्र उत्पादन क्षेत्रात ते भांडवल आल्यास त्याचा देशाला रोजगार निर्मितीसाठी उपयोगी ठरेल. रिटेलमध्येही विदेशी गुंतवणूक आल्यास रोजगारांच्या संधी वाढतील मात्र देशातील रिटेल उद्योजक मरण पावण्याचा धोका आहे.
----------------------------------------------------------------

0 Response to "ग्राहक हाच राजा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel