-->
हेल्मेटसक्तीचे राजकारण

हेल्मेटसक्तीचे राजकारण

संपादकीय पान मंगळवार दि. ०९ फेब्रुवारी २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
हेल्मेटसक्तीचे राजकारण
राज्यात दुचाकीस्वारांसाठी हेल्मेटच्या वापराची सक्ती केल्यापासून सर्व वातावरण ढवळून निघाले आहे. त्यात भरीस भर म्हणून राजकारनेही त्यात उसळी घेतली आहे. हेल्मेट सक्तीच्या विरोधात सर्वपक्षीय पुणेकर एकत्र आले आहेत. याविषयीचे राजकारण एवढे तीव्र झाले आहे की, सत्ताधारी शिवसेना व भाजपातील नेतेही या सक्तीच्या विरोधात उभे ठाकले आहेत. शेवटी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी याबाबत सर्व पक्षीय बैठक बोलाविण्याचा निर्णय घेतला आहे. खरे तर यापूर्वी कॉँग्रेसच्या राजवटीत ज्यावेळी हेल्मेटची सक्ती करण्याचा प्रयत्न झाला होता त्यावेळी शिवसेना-भाजपाच्या नेत्यांनी दंड थोपटले होते. हेल्मेटच्या विरोधातील राजकारणचा भाग आपण एकवेळ बाजूला ठेऊ. मात्र हेल्मेट सक्ती ही दुचाकीस्वाराच्या फायद्याचीच आहे, हा मुद्या विसरता कामा नये. पुण्यात एका तरुण मुलाच्या अशा प्रकारे अपघातात निधन झालेल्या पालकांनी याबाबत न्यायालयात अर्ज करुन यापुढे तरुणांचे जीव वाचविण्यासाठी हेल्मेटची सक्ती करावी असे कोर्टात निवेदन दिले होते. त्यानुसार न्यायालयाने याबाबत पुढाकार घेऊन हेल्मेटची सक्ती करावी असे आदेश दिले होते. मात्र यानंतर या प्रकरणावरुन राजकारणच जास्त पेटू लागले आहे. दिवाकर रावते यांचा यासंबंधी सक्ती करण्याचा आदेश कितीही चांगला असला तरी केवळ ही सक्ती करण्याचे प्रश्‍न सुटणारे नाहीत हे लक्षात घेणे गरजेचे आहे. आता तर दुसरे टोक गाठून दुचाकीस्वार असलेल्या पाठच्या माणसाही हेल्मेट सक्ती करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. एक बाब खरी आहे की, दुचाकीस्वारांपैकी पाठीमागे बसलेल्याच्या जीवाला सर्वात जास्त धोका असतो. परंतु महामार्गांवरुन किंवा राज्य महामार्गांवरुन जाताना अशा प्रकारची सक्ती करणे हे गरजेच आहे, त्याला कुणी आक्षेपही घेण्याचे कारण नाही. मात्र गावातून किंवा शहरातूनही एखाद्या छोट्या गल्लीतून जाताना हेल्मेटची सक्ती करणे हा एक अतिरेकच म्हटला पाहिजे. हेल्मेटमुळे अनेक दुचाकीस्वारांचे जीव वाचतील हा मुद्दा काही चुकीचा नाही. मात्र गेल्या काही वर्षात आपल्याकडे रस्त्यांवरील खड्‌ड्यात सापडून होणारे अपघात सर्वात भयानक आहेत. तसेच यामुळे अनेकांना जीवाला मुकावे लागतेच तसेच या खड्यातून प्रवास करताना पाठ व कंबर दुखीच्या अनेक व्याधी जडतात व त्यामुळे अनेकांचे आयुष्यमान कमी होते याचा कुणीच विचार करताना दिसत नाही. त्यादृष्टीने राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला मुद्दा महत्वाचा वाटतो. गेल्या काही वर्षांतील अपघातांचे प्रमाण पाहता रस्त्यातील खड्यामुळे झालेल्या अपघातांची संख्या ही मोठी आहे. तत्याचा आपण विचार न करता केवळ हेल्मेट वापराची सक्ती करणे योग्य ठरणार नाही. उलट हेल्मेटचा वापर करीत असताना खड्यातून प्रवास केल्याच त्याचे जास्त वाईट परिणाम होतात, असे अस्तिरोग तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे हेल्मेटची सक्ती करण्यापूर्वी रस्त्यांची दुरावस्था सुधारली पाहिजे. आपल्याकडे नियम पाळण्याऐवजी नियमांचा भंग करणारे लोक जास्त असतात. याचे कारण आपल्याकडे कायदा हा मोडण्यासाठीच असतो अशी शिवकण लहानपणापासूनच दिली जाते. त्याउलट जगात केवळ विकसीत नव्हे तर अनेक  आपल्यापेक्षा मागास असलेल्या देशातही नियम पाळले जातात. त्यासाठी लोकांना सक्ती करण्याची गरज प्रशासनाला वाटत नाही. लोकांनाच आपण नियम पाळले पाहिजेत असे मनापासून वाटते. एखाद्या झेब्रा क्रॉसिंगला रस्त्यावरुन जाणार्‍या माणसाला कितीही वेगात आलेली मोटार असो ती थांबून मार्ग मोकळा करुन देते. याऊलट आपल्याकडे मोटारांना प्राधान्य दिले जाते. रस्त्यावर होणारे अपघातांमागे आपल्याकडे प्रमुख कारण हे नियमांचे पालन न करणे हे आहे. त्यासाठी आपल्याकडे लहान वयापासून मुलांना याबाबत शिकविले गेले पाहिजे. दुचाकीस्वाराने हेल्मेट वापरणे गरजेचे आहे. परंतु त्यातून आपले संरक्षण होते आणि त्यामुळे आपण ते वापरले पाहिजे, अशी मानसिकता आपल्याकडे नाही. आपल्या शरीरातील डोके हा अत्यंत महत्वाचा अवयव आहे तसेच संपूर्ण शरीराचे नियंत्रण करणारा मेंदू हा याच डोक्यात असतो त्यामुळे त्याचे महत्व विशेष आहे. त्याचे संरक्षम करण्यासाठी हेल्मेट हे आवश्यक आहे, त्याचबरोबर चांगले रस्ते असणे हे देखील तेवढेच गरजेचे आहे. अर्थात चांगल्या रस्त्यांची जबाबदारी ही सरकारची आहे व हेल्मेट वापरण्याची जबाबदारी ही दुचाकीस्वाराची आहे. आपल्याकडे हे दोघेही बेजबाबदार आहेत. तसेच या प्रश्‍नी राजकारण करणारे राजकारणीही त्याला तेवढेच जबाबदार आहेत. आता हे प्रकरण आंगाशी येते म्हटल्यावर राज्याने याची जबाबदारी केंद्रावर ढकलली आहे. निदान केंद्राने तरी तत्परता दाखवून हेल्मेट सक्ती करावी व त्या जोडीला रस्तेही सुधारावेत आणि याबाबतचे चाललेले राजकारण थांबवावे.
-------------------------------------------------------------------------------

0 Response to "हेल्मेटसक्तीचे राजकारण"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel