-->
शनीदेवाचा विजय असोे!

शनीदेवाचा विजय असोे!

संपादकीय पान बुधवार दि. ०२ डिसेंबर २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
शनीदेवाचा विजय असोे!
दोन दिवसापूर्वी आपल्या देशात महाप्रकोप होता होता वाचला... त्याचे असे झाले, शनिशंगणापूर येथील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या शनीच्या मंदिरात चक्क एका  तरुणीने संरक्षणाचे कडे भेदून शनीच्या चौथर्‍यावर प्रवेश केला व शनीदेवाला तेल वाहिले. शनी महाराज खूप तप्त म्हणून ओळखले जातात. त्यांच्या जवळ कुणी महिलेने जायचे नाही असे पुराणातल्या आख्यायिकेत सांगितले आहे. जर असे कुणी धारिष्ट्य जर केलेच तर त्याचा प्रकोप होऊन कोणतीही आपत्ती येऊ शकते. परंतु आता दोन दिवस उलटले असले तरी सुदैवाने काही घडलेले नाही. आता तेथील ट्रस्टी व भाविक म्हणतील, आम्ही ही घटना घडल्यावर तातडीने शनिदेवाला दूधाची आंघोळ घातली व शुध्दीकरण केले. त्यामुळे काही प्रकोप झाला नाही. भक्त काही म्हणोत, आम्हाला आता खात्री वाटते की, शनि महारांजाना एका महिनेने तेल वाहिले तर त्याचे काही वाईट परिणाम दिसत नाहीत हे आता या निमित्ताने सिध्द झाले आहे. नाही तरी याच मंदिराच्या परिसरात चक्क सुरक्षा रक्षकच मद्यपान करीत असल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामुळे शनिदेव सध्याच्या काळात घडणार्‍या तथाकथीत वाईट घटनांना काही फारसे मनावर घेत नाहीत असे आम्हाला तरी वाटते. त्यामुळेच आम्ही शनिदेवांचे आभार मानतो व त्यांचा जयजयकार करतो. कारण आता बदलत्या काळानुसार आपल्यात बदल करुन घेण्याची तयारी शनीदेवाने ठेवली आहे, असेच दिसते. त्यामुळे आता ट्रस्टींनी महिलांनाही शनिदेवाला तेल वाहाण्यासाठी यापुढे परवानगी द्याला हरकत नाही. नाही तरी यापूर्वी येथे स्त्रीयांबरोबर पुरुषांनाही तेल वाहाण्यास बंदी होती. परंतु दिवसातून एकदाच अकरा हजार रुपये देऊन आरतीच्या वेळी एकाच पुरुषाला प्रवेश देण्यात आला. मात्र महिलांनी कितीही पैसे दिले तरी त्यांना प्रवेश बंद होता. अर्थातच सध्याच्या समानतेच्या काळात अशी परंपरा बंद करण्याची आता वेळ आली आहे. कोणत्याही देवापुढे मग तो कोणत्याही जाती-धर्माचा पुरुष-स्त्री असो तो समान आहे. त्याला देवाची पुजा करण्याचा समान हक्क मिळाला पाहिजे. मग तेथील प्रथा काहीही असल्या तरी त्या घटकाभर बाजूला ठेवल्या पाहिजेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना काळाराम मंदिरात प्रवेश करता यावा यासाठी शंभर वर्षापूर्वी संघर्ष करावा लागला. त्या काळी पूर्वापार चालत आलेली प्रथा मोडून काढण्यात आली. सर्व मानव जमातीला हे मंदिर खुले झाले. आज आपण एकवीसाव्या शतकात जागतिक महासत्ता बनण्याचे स्वप्न उराशी बाळगत असताना देवाच्या व्दारी मात्र अजूनही असमानता पोसत आहोत. इंदिरा गांधींना दोन वेळा पुरीच्या जगन्नाथ मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला होता. एकदा त्यांनी लग्न परधर्मियांशी केले म्हणून व दुसर्‍यांचा नाकारला तो त्या विधवा होत्या म्हणून. दुसर्‍यांदा त्या तेथे गेल्या त्यावेळी त्या देशाच्या पंतप्रधान होत्या, परंतु एक व्यक्ती म्हणून त्यांनी हा अपमान गिळला. गेल्या पंधरा दिवसापूर्वी अशाच एका दक्षिणेतील मंदिरात महिलांना मासिक पाळीच्या वेळी प्रवेश नाकारण्याचा निर्णय घेण्यात आला. महिलांना मासिक पाळी येणे हे निसर्गाचे चक्र आहे व त्यात अपवित्र ते काय? परंतु आपल्याकडे पुरुषी वर्चस्वाचा एवढा जबरदस्त पगडा आहे की, त्यातून महिला आयोगाच्या सदस्या देखील या बाबीचे समर्थन करताना दिसतात. या प्रथेचे समर्थन करताना महिला आयोगाच्या एक सदस्या म्हणाल्या होत्या की, मासिक पाळी ही अपवित्र नाही. मात्र मंदिरात असलेल्या प्रथा पाळल्या जाव्यात. मग पूर्वी दलितांना मंदिरात प्रवेश नाकारणे ही देखील प्रथाच होती. ती आपण मोडलीच ना? मग शनिदेवाला महिलांनी तेल वाहायचे नाही, मासिक पाळीच्या वेळी मंदिरात प्रवेश करावयाचा नाही, या प्रथा आपण मोडणार की नाही? अशा प्रकारच्या सुधारणा या फक्त हिंदुंच्या देवांना लागू केल्या जातात, देशातील पुरोगाम्यांनी मुस्लिमांच्या मशिदीत महिलांना का प्रवेश नाही? याचे उत्तर द्यावे, असा प्रश्‍न तावातावाने उपस्थित केला जातो. एक बाब लक्षात घेतली पाहिजे की, मुस्लिमांच्या मशिदीत महिलांना प्रवेश दिला जात नाही, हे चुकीचेच आहे. त्याचे कुणी समर्थन करुच शकणार नाही. परंतु दुसर्‍या एखाद्या धर्मात चुकीच्या प्रथा आहेत म्हणून आपण आपल्या धर्मातही चुकीच्या प्रथा पाडाव्यात यात शहाणपणा नाही. केरळात आता मशिदीत महिलांना प्रवेश द्यावा यासाठी चऴवळ सुरु झाली आहे, त्याचे स्वरुप लहान आहे परंतु भविष्यात त्यातून मोठी चऴवळ उभी राहून कदाचित महिला पुरुषांच्या बरोबरीने मशिदीत भविष्यात नमाज पडू शकतीलही. तूर्तास शनिदेवाचा जयजयकार करुन आम्ही साकडे घालीत आहोत की, या मानवाला समानतेने जगण्यासाठी बुध्दी व बळ द्या. निदान तुमच्या दारात तरी असमानता नको, ही शनिदेवाचरणी प्रार्थना.
----------------------------------------------------------------    

0 Response to "शनीदेवाचा विजय असोे!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel