-->
बालगुन्हेगारी आणि कायदा

बालगुन्हेगारी आणि कायदा

संपादकीय पान गुरुवार दि. २४ डिसेंबर २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
बालगुन्हेगारी आणि कायदा
दिल्लीत तीन वर्षापूर्वी झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर संपूर्ण देश खवळून उठला होता. हे भयाण कृत्य करणार्‍या गुन्हेगारात एक अल्पवयीन असल्याने त्याची सुटका गेल्या रविवारी झाली आणि तो मुक्त झाला. आता कायद्याने प्रौढ झालेल्या या गुन्हेगाराला एका स्वयंसेवी संस्थेच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याची सुटका झाल्याने अशा प्रकारच्या गुन्हेगारांना कडक शासन झाले पाहिजे मग तो बाल गुन्हेगार असला तरीही कडक शिक्षा ही झालीच पाहिजे, असे मत व्यक्त झाले आणि त्यातून बाल गुन्हेगारीची व्याख्या बदलणारे जे विधेयक राज्यसभेत पडून होते ते संमंत करण्याचा मार्ग मोकळा झाला. सध्या बाल गुन्हेगारांचे वय १८ वरुन १६ वर्षे करणारा हा कायदा आता संमंत झाला आहे. गेले तीन वर्षे हे विधेयक संसदेत मंजुरीसाठी पडून होते. अर्थात हा कायदा आता झाल्याने तीन वर्षापूर्वी दिल्लीत बलात्कार झालेल्या निर्भयाच्या या बालगुन्हेगाराला हा कायदा लागू होणार नाही. त्यामुळे तिच्या आईने, आपल्या मुलीला जरी न्याय मिळाला नाही तरी भविष्यातील पिडीतांना न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. आता या नवीन कायद्यानुसार १६ ते १८ या वयोगटातील बाल गुन्हेगाराने बलात्कार, खून असा गंभीर गुन्हा केल्यास त्यांच्यावर रितसर गुन्हा दाखल करुन अन्य गुन्हेगारांप्रमाणे खटला चालवून त्याला शिक्षा ठोठावली जाईल, मात्र त्याला फाशी दिली जाणार नाही. खरे तर राजीव गांधींच्या नेतृत्वाखालील सरकारने यापूर्वी बाल गुन्हेगारीचा कायदा बदलून वय १८ वरुन १६ वर्षांवर आणले होते. मात्र भाजपाच्या नेतृत्वाखालील अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने २००० साली हे वय पुन्हा १६ वरुन १८ वर्षांवर नेले. आता ते वय १६ वर्षांवर नेण्यासाठी दिल्लीतील बलात्काराची पार्श्‍वभूमी होती. त्यामुळे हा कायदा बदलण्यासाठी जनमानसाचा रेटा होता. गेल्या दहा वर्षात बाल गुन्हेगारी आपल्याकडे झपाट्याने वाढली आहे. ही वाढ केवळ दहा वर्षात ५० टक्क्याहून जास्त नोंदविली गेली. एका आकडेवारीनुसार २०१२ या एका वर्षात ३९ हजार ८२२ अल्पवयीन मुलांना गुन्ह्यासाठी पकडण्यात आले. यातील २६ हजार ४७३ मुले १६ ते १८ या वयोगटातील होती. या आकडेवारीवरून या प्रश्नाची दाहकता लक्षात यावी. आता कायदा करुन ही गुन्हेगारी कमी होईल असे मानणे चुकीचे ठरेल. मात्र बाल गुन्हेगारांत एक प्रकारचा धाक निर्माण होऊ शकतो. अर्थात यामुळे गुन्ह्याचे प्रमाण कमी झाले का हे काळाच्या ओघात दिसेलच. बाल गुन्हेगारांची  समस्या जगाला भेडसावित आहे, केवळ आपल्यासारख्या विकसनशील देशातील ही समस्या आहे असे नव्हे. अल्पवयीन कोणाला म्हणावे, त्यासाठी वय नेमके किती असावे? त्यांना गुन्हेगार म्हणून शिक्षा नेमकी कोणती करावी, त्यांच्यासाठी तुरुंगात स्वतंत्र व्यवस्था असावी का, त्यांना शिक्षा भोगताना चांगले शिक्षण देण्यात यावे, सुधारगृहांची स्थिती सुधारण्यात यावी, अशी चर्चा केवळ आपल्याकडेच नव्हे, तर जगभर सततच चाललेली असते. मात्र एक बाब स्पष्ट आहे की, एकदा त्याच्या कपाळी बाल गुन्हेगार म्हणून शिक्का लागला तर तो कायम बसणार नाही व तो पुढील काळात एक चांगले आयुष्य जगू शकतो अशी व्यवस्था करण्याची गरज आहे. बाल वयात विविध कारणांमुळे मग ते आर्थिक असो किंवा सामाजिक जर एखादा गुन्हेगारीकडे वळला असेल तर त्याला त्यातून बाहेर काढून एक नवीन आयुष्य जगण्याची संधी दिली गेली पाहिजे. वाल्याचा वास्मिकी जसा झाला तसे हे मुल कदाचित भविष्यात एक चांगला नागरिकही बनू शकतो. तसेच गेल्या काही वर्षात मुलांची वाढ झपाट्याने होत आहे तर त्याचबरोबर जग जवळ आल्यामुळे संगणकाच्या एका कळीवर तो वाटेल त्या गोष्टी पाहू, अनुभवू शकतो, त्यातून त्याच्या बाल मनावर अनेकदा बरे-वाईट परिणाम होत असतात. सोशल नेटवर्किंगमध्ये तर त्याला अनेक बाबी प्रौढ होण्याच्या अगोदरच समजू शकतात. अशा पार्श्‍वभूमीवर बाल गुन्हेगारांचे वय आता १६ होणे जसे ओघाने येणे क्रमप्राप्त ठरते, हे मान्य आहे, परंतु त्याच बरोबर बाल गुन्हेगारी कमी होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. अनेकदा हे बाल गुन्हेगार घडतात का, याचा विचार करुन त्याच्या मुळाशी जाऊन काम करण्याची गरज आहे. असे गुन्हेगार त्याच्या भोवतालची परिस्थिती, त्याच्या घरातील वातावरण, घरातील पालकांचे कौटुंबिक संबंध कारणीभूत ठरतात. यातून बाल मनावर अनेक परिणा घडतात व त्यातून बाल गुन्हेगाराची निर्मिती होते, हे विसरुन चालणार नाही. नवीन कायद्याचे स्वागत करीत असताना आपण या बाबी लक्षात घेण्याची आवश्यकता आहे.
-------------------------------------------------------------------------------

0 Response to "बालगुन्हेगारी आणि कायदा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel