-->
सेक्युलर पक्षांना नवी उमेद

सेक्युलर पक्षांना नवी उमेद

रविवार दि. २२ नोव्हेंबर २०१५ च्या मोहोरसाठी लेख --
-------------------------------------------
सेक्युलर पक्षांना नवी उमेद
-----------------------------------------
पाटणाच्या गांधी मैदानावर नितिशकुमार यांचा झालेला शपथविधी हा केवळ त्यांचा पाचव्यांदा मुख्यमंत्री होण्याचा उपचार नव्हता, तर देशातील सेक्युलर विचारधारा मानणार्‍या पक्षांना एक प्रकारची संंजीवनी देणारा मेळावाच होता. देशातील गेले दोन वर्षे राजकारण हे फक्त नरेंद्र मोदी या एकाच व्यक्तीभोवती केंद्रीत झाले होते. या माणसाकडे काहीतरी जादूची कांडी आहे आणि देशाचे चित्र केवळ मोदीच पलटवू शकतात, अशी आपल्या देशातील भोळाभाबड्या जनतेची समजूत झाली होती. मात्र नरेंद्र मोदींची केवळ ही आश्‍वासनेच होती व देशातील जनतेच्या अपेक्षांचे भांडवल करुन त्यांनी सत्ता काबीज केली, हे समजायला जनतेला १८ महिने घालवावे लागले. बाहेरुन विकासाचा मुखवटा परिधान करणार्‍या भाजपा व मोदींचा खरा चेहरा हा हिंदुत्वाचाच आहे हे देखील लोकांना आता पटले आहे. दादरीच्या घटनेनंतर भाजपाचा व मोदींचा  हिंदुत्वाचा मुखवटा हा टराटरा फाडला गेला. शेवटी अशा प्रकारचे राजकारण आम्हाला पसंत नाही, भारताला जर एकसंघ ठेवायचे असेल तर सेक्युलर भारतच पाहिजे हे बिहारच्या निकालानंतर स्पष्ट झाले. नितीश-लालू-कॉँग्रेस ही सेक्युलर पक्षांची बांधलेली मोट यशस्वी ठरली. अर्थातच यामागे नितीशकुमार यांची स्वच्छ प्रतिमाही त्यांना कामी आली. आता हाच प्रयोग देशात होऊ शकतो किंवा आगामी काळात येणार्‍या विधासभा निवडणुकीत अशा सेक्युलर पक्षांना एकत्र आणल्यास विजयश्री खेचून आणता येऊ शकते, याचा विश्‍वास भाजपा विरोधी पक्षांना आला. त्यामुळेच नितीश-लालू यांनी या शपथविधीच्या निमितातने पुढाकार घेऊन भाजपाविरोधी पक्षांना एकत्र आणले आहे. देशाच्या सेक्युलर राजकारणातील हे एक महत्वाचे पाऊल ठरु शकते.
स्वातंत्र्यानंतर आपल्याकडे लोकशाहीची जी पाळेमुळे घट्ट झाली त्यात सेक्युलर राजकारणाचा मोठा वाटा आहे. आपला देश कोणत्याही एका धर्माच्या तालावर नाचू शकणार नाही. आपल्याकडील विविध धर्मीयांची जी एकजूट आहे त्यातून आपण आपली एकसंघ राष्ट्राची संकल्पना रुजविली आहे. यामागे हिंदुत्ववाद नाही. परंतु, सत्ता डोक्यात गेलेल्या भाजपच्या नेत्यांना हे काही पटत नव्हते. आपल्याला पाच वर्षांसाठी निवडून दिले आहे त्यात आपण काहीही करु शकतो, ही त्यांची मिजास होती. ती मिजास आता बिहार निवडणुकांच्या निमित्ताने उतरायला लागली आहे. निदान त्यांचे बेताल वक्तव्य करणारे नेते आता एकदम गप्प झाले आहेत. बिहारला बिमारु राज्य म्हटले जाते. मात्र, तेथील जनता ही चाणाक्ष आहे, हे आपण विसरु शकत नाही. आणीबाणी उठल्यावर जनता पार्टीची सभा ही पाटण्यात जयप्रकाश नारायण यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. या सभेने  देशात त्याकाळी सोशल मीडिया व टी.व्ही. चॅनेल नसतानाही मोठा झंजावात निर्माण केला. आतादेखील हिंदुत्ववाद की सेक्युलर देश हवा अशी परिस्थिती निर्माण झाली असताना बिहारच्या जनतेने सेक्युलर राजकारणाच्या दिशेने कौल देऊन देशातील राजकारणाची दिशा बदलण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपने बिहारमध्ये जाती, धर्माचे धुव्रीकरण करुन ही निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केला. परंतु, दलित व मुस्लिमांची एकगठ्ठा मते ही नितीश-लालू-कॉंग्रेस यांना पडल्याने भाजपचा डाव पूर्णपणे फसला. दादरीसारख्या घटनांमुळे हिंदूंचे धुव्रीकरण करण्याचा भाजपचा बेत होता. पंतप्रधानांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली होती त्यामुळे संपूर्ण मंत्रिमंडळ येथे प्रचारासाठी उतरविण्यात आले होते. तसेच खुद्द मोदी यांनी ३१ प्रचार सभा घेतल्या. आजवर कोणत्याही पंतप्रधानाने राज्याच्या राजकारणात एवढा रस घेऊन निवडणूक सभा घेतल्या नव्हत्या. अमित शहा यांनी ८० च्या वर सभा घेतल्या होत्या. मांझी यांना काही भागात मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले होते. परंतु, त्यांच्याकडे वा राज्यातल्या कोणत्याही नेत्याकडे निवडणुकीची सूत्रे नव्हती. त्यामुळे तुम्ही बिहारी नेता पसंत करणार की बाहेरचा नेता, असा सवाल नितीश-लालू यांनी केला होता. त्याला बिहारी जनतेने मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. गेल्या तीन महिन्यांत २०० च्या वर साहित्यिक, कलाकारांनी देशातील असहिष्णुतेच्या वातावरणाच्या निषेधार्थ आपले शासकीय पुरस्कार परत केले, याचाही अप्रत्यक्ष परिणाम मतदारांवर झाला आहे. गेल्या काही दिवसांत तर असहिष्णुतेच्या मुद्द्यावरुन देश पूर्णपणे ढवळून निघाला असताना ही निवडणूक झाली. बिहारी जनतेने मात्र भाजपच्या विरोधात कौल देऊन पुरस्कार परत करणार्‍या साहित्यिक, कलाकारांना मोठे बळ दिले आहे. बिहारच्या विकासाचा मुद्दाही यावेळी प्रामुख्याने चर्चेत होता. नितीशकुमार यांनी गेल्या दहा वर्षांच्या काळात बिहारला विकासाचे एक नवीन परिमाण दिले. त्यांच्या काळात बिहारमध्ये मोठे उद्योग आले नसले तरीही लहान-लहान उद्योगातून रोजगार निर्मिती केली. त्यामुळे बिहारमधून बाहेर रोजगारासाठी जाणार्‍यांची संख्या कमी झाली. कायदा सुव्यवस्थेत चांगली सुधारणा झाल्याने महिलांनी यावेळी मोठ्या प्रमाणात मतदान केले आहे आणि हे मतदान नितीश यांच्याच पदरात पडले. नरेंद्र मोदी हे केवळ गप्पा करतात, आतादेखील त्यांनी बिहारमध्ये अशीच आश्‍वासनांची खैरात केली आहे, अशी मतदारांची पक्की धारण झाली. यातून नितीश यांचे बळ उलट वाढले. बिहारची निवडणूक राज्याची असली तरीही देशाच्या राजकारणाची दिशा बदलणारी ठरणार आहे, हे नक्की. यातून सेक्युलर पक्षांना एक नवीन उमेद मिळाली आहे. देशात धर्माचे नव्हे तर सेक्युलर राजकारण होऊ शकते याची आशा निर्माण झाली आहे.
-------------------------------------------------------------------

0 Response to "सेक्युलर पक्षांना नवी उमेद"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel