-->
शहरातील वाहतूक समस्या

शहरातील वाहतूक समस्या

संपादकीय पान सोमवार दि. २० जुलै २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
शहरातील वाहतूक समस्या
सध्या मुंबई-पुण्यासारखे महानगर असो किंवा अन्य कोणतेही मध्यम आकाराचे शहर असो तेथे सर्वात मोठा भेडसाविणारा प्रश्‍न म्हणजे वाहतूक समस्या. मुंबईसारख्या मोठ्या शहरात ही समस्या गंभीरच आहे. मुंबईत दिवसाकाठी ५९१ वाहने मुंबईच्या रस्त्यांवर नव्याने उतरत आहेत. मागील सहा महिन्यांच्या कालावधीत मुंबईतील रस्त्यांवर अनधिकृतपणे पार्किंग करण्यात आलेल्या ४३ हजार ४१४ वाहनांवर कारवाई करण्यात आली. परंतु यामुळे हा प्रश्‍न सुटणारा नाही.
मुंबई आणि उपनगरात वाहनतळांचा विचार केल्यास हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच वाहनतळे आज शहरात उपलब्ध आहेत. यामध्ये एमएमआरडीए बीकेसीमध्ये ८०० गाडयांचे पर्किंग, नरिमन पॉइंट येथे ८५० गाडयांचे पार्किंग उपलब्ध करण्यात आले आहे. अर्थात पार्किंगची ही सोय नगण्यच आहे. आता अनेक ठिकाणी पार्किंगची सोय करताय येणे अश्यक्य आहे. कारण वाहानांची संख्या लाखोंच्या संख्येने वाढत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. वाहनांच्या दिवसेंदिवस फुगत जाणार्‍या आकडयाचा गांभीर्याने विचार न केल्यास पुढील काळात पार्किंगची भीषण परिस्थिती शहरात निर्माण होऊ शकते. खरे तर ही परिस्थीती सध्याच उद्भभवली आहे. मुंबई शहर असो किंवा अन्य शहरात आता लोकांना पाच-दहा लाखाची गाडी घेणे ही काही कठीण बाब राहिलेली नाही. वाहानांची कर्जे देण्यासाठी बँका व वित्तसंस्था तत्परतेने तयार आहेत. त्यातच आपल्या दाराशी आपली गाडी असणे हे एक मध्यमवर्गीयांचे आयुष्यातील एक मोठे स्वप्न असते. शहरातील अनेक घरांमध्ये नवरा बायको जर नोकरीला असले तर एक लाख रुपयांच्या घरात सहज दरमहा पगाराच्या रुपाने पैसे येतात. त्यामुळे त्यांना एकवेळ घर घेणे कठीण जाते परंतु गाडी घेणे सोपे वाटते. त्यातच आणखी एक प्रश्‍न म्हणजे मुंबईची ढेपाळलेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था. मुंबईच्या लोकलचा प्रवास म्हणजे छळछावणीचे स्वरुप असते. त्यामुळे अनेक लोक त्या लोकल्समधून प्रवास करण्याऐवजी स्वता:च्या गाडीतून प्रवास करुन कार्यालय गाठणे पसंत करतात. यातून अनेकदा वाहतूक समस्या वाढते. त्यामुळे जर सार्वाजनिक वाहतूक वितरण व्यवस्था जर चांगली केली तर लोक त्याने प्रवास करणे पसंत करतील. परंतु गेल्या काही वर्षात प्रामुख्याने दिल्लीतील मेट्रोचा प्रयोग यशस्वी झाल्यावर सरकारला जाग आली व मुंबईतही मोनो व मेट्रोचे जाळे उभारण्यास सुरुवात झाली. दिल्लीतील देखील मोठी वाहतूक समस्या होती. परंतु मेट्रोचे जाळे दिल्लीभर उभारल्यावर दिल्लीतील प्रदूषण व वाहतूकही कमी झाली. त्यानंतर मोठी शहरे असलेल्या राज्यांना हे वास्तव पटले व त्यांनी मेट्रोचे जाळे उभारण्यास सुरुवात केली. यातील पहिला धडा युरोपने जगाला दिला. आज अमेरिका असो किंवा युरोप त्यांच्याकडील प्रत्येक देशात उत्कृष्ट सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे. युरोपात तर कितीही आर्थिकदृष्ट्या सधन माणूस असला तरी तो सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेलाच पसंती देतो. आपल्याकडे नेमके उलटे आहे. आपल्याकडे श्रीमंती आली की ती पहिल्यांदा घरात नवनवीन गाड्याच्या स्वरुपात दिसते. यातून होते काय तर शहरातील वाहतूक समस्या वाढत जाते. वाहन खरेदी करणे ही चैन आहे की गरज, केवळ समाजात प्रतिष्ठा मिळवण्यासाठी वाहन खरेदी करतो आहोत का? या सर्वाचा विचार करून वाहन खरेदी केल्यास स्वत:सोबत शहरांतील वाहतुकीचा प्रश्न मिटण्यास हातभार लागू शकतो. गेल्या काही वर्षात आपल्याकडे जगातील वाहन कंपन्यांनी देशात दुकाने थाटली. ऑटोमोबाईल कंपन्यांमध्ये निर्माण झालेल्या स्पर्धेमुळे वाहने अधिकाधिक स्वस्त आणि आरामदायी सेवा देण्याचा कल या कंपन्यांचा सध्या सुरू आहे. दूरचित्रवाणीवर सुरू असलेल्या उत्पादनांच्या जाहिराती देखील ग्राहकांना अधिक आकर्षित करत असल्याने अनेकांना नवीन वाहनांचा मोह आवरता येत नाही.
अनेक खासगी कंपन्यांकडून कर्मचार्‍यांना विशिष्ट पद्धतीच्या मोटारी घेण्यास सांगितले जाते. वाहन कर्ज देखील कंपनी उपलब्ध करून देते. ५० हजार ते १ लाख मासिक उत्पन्न असलेला नोकरदारवर्ग यामध्ये सहभागी असतो. वाहन घेण्यासाठी आर्थिक परिस्थिती, वाहन आपली गरज आहे की चैन? आपण वाहन का घेत आहोत? वाहनाला लागणारी पार्किंग उपलब्ध आहे का? या सर्व बाबींचा विचार करणे गरजेचे आहे. तातडीची गरज नसल्यास केवळ चैनीखातर वाहन खरेदी केल्यास शहरात भीषण वाहतूक कोंडी निर्माण करण्यास आपण तर जबाबदार नाही ना? आपण खरेदी करणारे वाहन गरज आहे की प्रतिष्ठा असा प्रश्न स्वत:ला विचारणे गरजेचे आहे. युरोपातील व अमेरिकेतील वाहन विक्रीची बाजारपेठ आता संकुचित झाल्याने या कंपन्यांनी आपला मोर्चा भारत व चीन या विकसनशील देशांकडे वळविला. तसेच या कंपन्यांच्या लॉबिंगमुळेच देशातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कशी ढेपाळलेली राहिली हे पाहिले गेले असाही आरोप केला जातो. या आरोपात किती तथ्य आहे हे सांगता येणार नाही मात्र आपला माल विकण्यासाठी बहुराष्ट्रीय कंपन्या कोणत्याही थराला जातात हे जगाने पाहिले आहे. परंतु आता वाहतूक कोंडीची समस्या पाहता आपण सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्याच्या दृष्टीने आता पावले टाकण्याची गरज आहे. रस्ते कितीही वाढवून किंवा नव्याने बांधून ही समस्या सोडविता येणार नाही. तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाच मजबूत करावी लागेल.
------------------------------------------------

0 Response to "शहरातील वाहतूक समस्या"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel