-->
संपादकीय पान शुक्रवार दि. २४ एप्रिल २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
बालेकिल्ला राखला
रायगड जिल्ह्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात शेतकरी कामगार पक्ष व राष्ट्रवादीने आपापले बालेकिल्ले राखण्यात यश मिळविले आहे. केंद्रात व राज्यात सत्तेत असल्यामुळे भाजपा व शिवसेना यांच्या डोक्यात हवा गेली होती आणि आपण या निवडणुकीत मोठा विजय प्राप्त करु अशी हवा तयार केली होती. मात्र मतदारांनी त्यांना पुन्हा एकदा चांगलाच हिसका दिला आहे. ग्रामीण भागात ग्रामपंचायतीतील निवडणुकांमध्ये मतदारांचा उत्साह भरभरुन असो हे नेहमीचे चित्र दिसले. त्यामुळे अनेक ठिकाणी मतदानाचे प्रमाण ८० टक्क्यांच्यावर गेले होते. तर शहरी भागातील नवीन मुंबई महानगरपालिकेतील मतदान जेमतेम ५० टक्के झाले होते. शहरी व ग्रामीण भागातील मतदानाच्या उत्साहाचा हा फरक आपल्याला नेहमीच दिसतो. पनवेल तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शेकापने १४ पैकी १० ग्रामपंचायतीत सत्ता कमविल्याने पनवेल तालुक्यात आपला प्रभाव कायम असल्याची चपराक अन्य पक्षांना दिली आहे. एवढेच नव्हे तर साई ही कॉँग्रेसची ग्रामपंचायत आपल्याकडे खेचून आणण्यात शेकापला यश आले आहे. रोह्यातील निडीतर्फे अष्टमी ही ग्रामपंचायत राष्ट्रवादीकडून खेचून आणण्यात शेकापला यश आले. तसेच अलिबाग तालुुक्यातील  सासवणे, पेजारी, वाघोडे या ग्रामपंचायतींवर शेकापने आपली सत्ता कायम राखली आहे. यातील सासवणे ग्रामपंचायतीत ९ पैकी ९ शेकापचे उमेदवार विजयी झाले. तालुक्यातील वाघोडे ग्रामपंचायतीच्या नऊ पैकी आठ जागांवर शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारांची बिनविरोध यापूर्वीच झाली होती. त्यात प्रभाग एकमध्ये जगन्नाथ रामचंद्र पाटील, मोनिका महेंद्र साळवी, प्रतिभा दत्ता नाईक, प्रभाग दोनमध्ये प्रितम जगन्नाथ पाटील, काशीनाथ कृष्णा नाईक, प्रभाग तीनमध्ये रेणूका मुकेश नाईक, सुवर्णा सुनील माने, संतोष दगडू पवार असे एकूण आठ शेकापचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. मात्र प्रभाग दोनमध्ये एक जागेसाठी मतदान झाले होते. पेझारी ग्रामपंचायतीच्या नऊ जागांपैकी पाच जागांवर प्रभाग एकमधील श्रीदास प्रकाश म्हात्रे, मनिषा रमेश पाटील, प्रभाग दोनमध्ये स्वाती नितीन पाटील व प्रभाग तीनमध्ये चित्रांगी चंद्रकांत म्हात्रे, प्रतिक्षा प्रदिप पाटील या शेकापच्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. तसेच प्रभाग तीनमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार सचिन सुरेश धुमाळ यांची बिनविरोध निवड झाली. पेझारी ग्रामपंचायतीच्या एकूण सहा जागांवर बिनविरोध निवड झाली. या निवडणुकीच्या निमित्ताने शेकापची ग्रामीण मतदारांवर चांगलीच पक्कड असल्याचे सिध्द झाले आहे. अलिबाग-मुरुड मतदारसंघातून शेकापचे पंडीत पाटील हे आमदार म्हणून निवडून आल्यापासून त्यांनी अनेक विकास कामे हाती घेतली आहेत. तसेच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकासगंगा गाव पातळीपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळेच येथील मतदार शेकापच्याच मागे ठामपणाने उभा असल्याचे स्पष्ट आहे. रायगड जिल्ह्याला लागून असलेल्या नवी मुंबई महानगपालिकेच्या निवडणुकीबाबत यावेळी फार मोठ्या प्रमाणात उत्सकता होती. कारण राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांची प्रतिष्ठा येथे पणाला लागली होती. लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्यावर नाईक कुटुंबियांना आता महानगरपालिका आपल्याकडे राखण्यासाठी आटापीटा करावा लागणार होता. या निवडणउकीत राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत नसले तरीही बहुमताच्या काठावर ते पोहोचले आहेत व कॉँग्रेसच्या दहा उमेदवारांच्या सहकार्याने ते सत्ता काबीज करु शकतात. त्यामुळे शिवसेना व भाजपाचे सत्ता काबीज करण्याचे स्वप्न भंगले आहे. येथेही राष्ट्रवाजीने आपला किल्ला कायम राखण्यात यश मिळविले आहे. खरे तर हा विजय राष्ट्रवादीचा आहे असे म्हणण्यापेक्षा तो गणेश नाईक यांचा आहे असे म्हणणे योग्य ठरेल. कारण गणेश नाईक यांचा व्यक्तीश: या मतदारांवर मोठा प्रभाव आहे. त्यांच्या पक्षात राहाण्याचा राष्ट्रवादीला मोठा फायदा झाला आहे हे नक्की. राष्ट्रवादी कॉँग्रेस आता नवी मुंबईत सत्ता स्थापनेसाठी कॉँग्रेसचा पाठिंबा घेते की अपक्षांच्या मदतीने सरकार स्थापते हे पहावे लागेल. गणेश नाईक हे कॉँग्रेसची धोंड गळ्यात घालून घेण्यापेक्षा अपक्षांना आपल्या बाजूने करणे पसंत करतील. राज्यीतल एक श्रीमंत व सुशिक्षित मतदार असलेल्या या महानगरपालिकेत ग्रामीण भागही मोठ्या प्रमाणात येतो. मुंबईचे एक जुळे नगर म्हणून हा प्रदश विकसीत झाला. मुंबईत घरे घेणे परवडेनासे झाले त्यावेळी हळूहळू लोकांनी येथे जागा घेतल्या. त्यामुळे य्ेथील शहरी भागात बाहेरुन आलेल्या लोकांचे प्रबल्य आहे. या महानगरपालिकेच्या परिसरात औद्योगिक पट्टे असल्यामुळे येथे रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध झाल्या. सिडकोने येथील बराच भाग नियोजनबध्द विकसीत केला खऱा परंतु त्यांचे नियोजन हे अनेक भागात फसले आहे. त्यामुळे या महापालिकेपुढे पुढील काळात अनेक नागरी समस्यां उभ्या राहाणार आहेत. नवीन मुंबईचा विमानतळ येथे येणार अशी अफवा पसरल्यापासून येथील जागांच्या किंमती गगनाला जाऊन भिडल्या. विमानतळाच्या परिसरातील अनेक जागा राजकारण्यानी आपल्या ताब्यात पूर्वीच घेऊन ठेवल्या आहेत. नवी मुंबईचा विमानतळ एकदा सुरु झाला की येथील विकासाला आणखीनच वेग येणार आहे. अशा वेळी येथील प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यावर मोठी जबाबदारी येऊन पडणार आहे. पुढील पाच वर्षे राष्ट्रवादीची सत्ता या महानगरावर राहिल. परंतु या सत्तेचा चांगला वापर करुन त्यांनी हे महानगर देशातील एक सुंदर शहर म्हणून विकसीत करण्याचे नियोजन करावे. तरच जनता त्यांना दुवा देईल.
-----------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel