-->
संपादकीय पान मंगळवार दि. ३१ मार्च २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
जगज्जेता ऑट्रेलिया
क्रिकेटचा वर्ल्ड कप अखेर ऑस्ट्रेलियाने आजवर पाच वेळा आपल्याकडे राखण्याचा एक जागतिक विक्रम केला आहे. भारतीय संघाकडून सुरुवातीच्या काळात फार मोठ्या अपेक्षाच नव्हत्या. मात्र एक-एक सामने जिंकण्याचा सपाटा लावल्यावर व पाकिस्तानच्या संघाचा पराभव केल्यावर भारतीयांच्या भारतीय संघाकडून अपेक्षा वाढल्या. भारत यावेळी विश्‍वचषक जिंकू शकतो अशी आशा निर्माण झाली. जाहिरातदारांनी करोडो रुपये त्यासाठी खर्च केले. मात्र भारतीय संघाने निराशाच केली व उपान्य फेरीत भारत बाद झाला. ऑस्ट्रेलियाचा संघ ज्या हिंमतीने, जिद्दीने पहिल्यापासून खेळला ते पाहता त्यांचा या चषकावर हक्कच होता असे वाटू लागले. त्यांच्या भूमित हे सामने खेळले गेल्याने त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरली, मात्र केवळ विजयश्री खेचून आणण्यात हेच एकमेव कारण आहे असे मात्र नव्हे.पाचवे विश्वविजेतेपद मिळवताना अतिउत्कृष्ट कामगिरी हे ऑस्ट्रेलियाच्या विजयाचे सार आहे. ऑस्ट्रेलियन संघाच्या कामगिरीत सातत्य राहिले. या काळात आशिया खंड आणि जाहिरातदारांची ताकद मागे असलेला भारतीय संघ जोशात पुढे आला खरा; पण ऑस्ट्रेलियाने त्या बदलाच्या काळातही आपल्या खेळाचा आत्मा बदलला नाही.
क्रिकेटमधून मिळणार्‍या संपत्तीचा ओघ भारतीय क्रिकेटच्या तिजोरीकडे वळला असला तरीही ऑस्ट्रेलियाचा संघ आक्रमक, मर्दानी आणि क्रिकेटरसिकांना आवडणारे क्रिकेट खेळत राहिला. ११ विश्वचषकांपैकी तब्बल पाच विश्वचषक जिंकणार्‍या या संघाने क्रिकेट हा खेळ खर्‍या अर्थाने जिवंत ठेवला. २०१५च्या विश्वचषक स्पर्धेत त्यांनी स्वत:च्या कौतुकाचे ढोल बडवले नाहीत. जाहीरतदारांच्या प्रेरणेने या संघाच्या डोक्यात हवाही गेली नाही. अशा प्रकारची हवी आपल्या संघात सर्वात पहिल्यांदा जाते. सर्व संघांना पाणी पाजत असतानाही त्यांनी अंतिम फेरीपर्यंत आपण संभाव्य विजेते असल्याची कधीच गुर्मी केली नाही. बाद फेरीच्या सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियन संघाने आपल्या वर्चस्वाची झलक खर्‍या अर्थाने दाखवायला सुरुवात केली. ज्या खेळपट्टीवर अन्य संघांना १४० च्या आसपास चेंडूचा वेग ठेवता येत होता त्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी १४५च्या पुढे चेंडूचा वेग नेला. त्याच खेळपट्टीवर न्यूझीलंडने ठेवलेले १८४ धावांचे सहज गाठू शकणारे लक्ष्य त्यांनी पार केले.
भारताविरुद्ध सामन्यात याच ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी खेळपट्टी संथ आहे हे लक्षात येताच चेंडूच्या वेगात बदल करून चातुर्याने भारताच्या कथित धावांच्या मशिन्स बंद पाडल्या. त्या खेळपट्टीवर चेंडू रिव्हर्स स्विंग होत असतानाही भारतीय गोलंदाज मात्र आपटबारचा वापर करीत होते. फलंदाजीत स्टीव्हन स्मिथने दाखवलेले सातत्य  विराट कोहलीला दाखवता आले नाही, ही भारतीय क्रिकेटची खरी शोकांतिका. अल्पशा यशानंतर डोक्यावर घेणार्‍या भारतीय प्रेक्षकांच्या तुलनेत ऑस्ट्रेलियन क्रिकेटरसिकांचा संयम, समंजसपणादेखील वाखाणण्याजोगा आहे. ना खेळाडूंना गर्व, ना प्रेक्षकांचे वागणे वाह्यातपणाचे. विश्वचषक जिंकल्याबद्दल संघाचे समयोचित कौतुक त्यांनी केले. कौतुकाचा अतिरेक होऊ दिला नाही. भारतीय प्रेक्षकांनाही ही गोष्ट उमजेल तो आपल्या क्रिकेटसाठी सुदिन असेल. गेल्या अनेक वर्षांपासून ऑस्ट्रेलियात क्रिकेट यशाच्या शिखरावर नव्हते. एकदिवसीय क्रिकेटमधील कामगिरीच्या क्रमवारीत तर त्यांनी चक्क सातव्या क्रमांकावरून अव्वल नंबर गाठला. कसोटी क्रिकेटच्याही अग्रस्थानावर ते नव्हते. संघाच्या जडणघडणीच्या, बदलाच्या प्रक्रियेतून जातानाही त्यांनी आपल्या क्रिकेटचा आत्मा बदलला नाही. क्रिकेटचा जन्म ज्या देशात झाला तो इंग्लंड यावेळी कुठल्याकुठे बाहेर फेकला गेला, मात्र खेळात जय-पराजय हा असतोच. यातून पुढे कधी तरी हा संघही वर येऊल. पराभवातही त्यांनी शान कायम ठेवली होती. म्हणून आजही ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंडमध्ये दर्जेदार क्रिकेट खेळणार्‍या देशांच्या कसोटी सामन्यांना हाऊसफुल्लचा फलक झळकतो. याचे कारण ऑस्ट्रेलियन क्रिकेट आहे. क्रिकेट हे स्टेडियमवर येणार्‍या प्रेक्षकांसाठी खेळावे हे धोरण त्यांनी पराभवातही कायम ठेवले. पराभवाला ते घाबरले नाहीत. उलट स्टेडियमवर येणार्‍या प्रेक्षकांना त्यांचे पैसे वसूल करून द्यावेत यासाठी कसोटी सामन्यांमध्ये फलंदाजी व गोलंदाजीत वेग, सातत्य कायम ठेवले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळपट्टी खराब आहे, ओलसर आहे असा कांगावा करून आपल्या अपयशावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला नाही. उलट खराब खेळपट्टीवरही धावा कुटण्याचे आव्हान त्यांनी स्वीकारले. अन्य देशांच्या क्रिकेटरसिकांनीही म्हणूनच ऑस्ट्रेलियन क्रिकेटवर प्रेम केले. त्यांच्या गोलंदाजीच्या नैपुण्यावर, फलंदाजीतील धाडसावर आणि क्षेत्ररक्षणाच्या कलेवर तमाम क्रिकेटविश्व म्हणूनच फिदा आहे. बीसीसीआयप्रमाणे ङ्गक्रिकेट ऑस्ट्रेलियाफची तिजोरी पैशांनी ओसंडून वाहत नाही. तरीही त्यांनी देशभरात दर्जेदार क्रिकेट अकादमी उभ्या केल्या. पैसे देऊन स्टेडियमवर येणार्‍या प्रेक्षकांसाठी उपयुक्त सुविधा निर्माण केल्या, ज्या सेवांपासून भारतीय क्रिकेटरसिक अद्यापही वंचित आहेत. क्रिकेटच्या विकासासाठी नवनवे प्रयोग केले व ते यशस्वी करून दाखवले. बीसीसीआय आणि त्यांच्या पदाधिकार्‍यांप्रमाणे कुणाचीही नावे भ्रष्टाचाराच्या प्रकरणात गोवली गेली नाहीत. क्रिकेटने ऑस्ट्रेलियन क्रिकेटला भारतासारखा प्रचंड पैसा दिला नाही. मात्र जो पैसा आला त्याचा योग्य विनियोग केला गेला. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट समांतर उंचीवर कायम राहिले. म्हणून त्यांच्या पाचवे विश्वविक्रमी विजेतेपद पटकावण्याआधीच्या वक्तव्यात दर्पोक्ती नव्हती, विजेतेपदानंतरही उन्माद नव्हता. भविष्यकाळात उंचावलेला दर्जा खालावणार नाही याची जाणीव त्यांना होती. हीच तर खर्‍या चॅम्पियन्सची लक्षणे आहेत. आपल्याकडे क्रिकेट हाच एकमेव खेळ आहे असे लोकांना वाचते. यातूनच अन्य खेळांचे नुकसान होते ही शोकांतिका आहे. एकीकडे भारतीय संघ पराभव चाखीत असताना दुसरीकडे सायना नेहवाल ही टेनिसपटू जगातील पहिल्या क्रमांकावर पोहोचली. मात्र या घटनेचे कुठेच जास्त कौतुक झाले नाही, ही दुदैवी बाब म्हटली पाहिजे.
--------------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel