-->
संपादकीय पान बुधवार दि. २८ जानेवारी २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
------------------------------------------
...रेषा स्तब्ध झाली!
ज्यांच्या पेन्सीलच्या एका फटकार्‍यात एवढी जबरदस्त ताकद होती की हजार शब्दंाचा एक अग्रलेख किंवा लेखही फिका वाटावा, ते ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण काळाच्या पडद्याआड गेले आहेत. लक्ष्मण ९४ वर्षांचे आयुष्य जगले. त्यातील किमान ६० वर्षे ते सक्रिय होते. गेली दहा वर्षे त्यांचे वास्तव्य पुण्यात होते, त्यातील गेली तीन-चार वर्षे त्यांची प्रकृती त्यांना साथ देत नव्हती. स्वातंत्र्यापूर्वीपासून ते स्वातंत्र्यानंतरचा महत्वाचा कालखंड त्यांनी पाहिला, अनुुभवला. अनेक राजकीय व्यक्तिमत्वांना, पुढार्‍यांना, नेत्यांना त्यांनी आपल्या रेषांचे फटकारे मारुन जमिनीवर आणले. आपलल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून त्यांनी जशी रेवडी उडविण्याचे काम केले तसेच चांगल्या बाबींचे कौतुकही केले. बाळासाहेब ठाकरे व लक्ष्मण हे समवयस्कर होते. त्या पिढीतले हे दोन गाजलेले व्यंगचित्रकार आता या जगातून निघून गेले आहेत. बाळासाहेब व लक्ष्मण यांची मते काही परस्परांना पटणारी नव्हती मात्र असे असले तरी परस्परांच्या व्यंगचित्रांचे गुण-दोष ते परस्परांना सांगत असत. या दोन्ही कलाकारांची राजकीय मते भिन्न असली तरी ते दोघे कलाकार या नात्याने चांगले मित्र होते. बाळासाहेबांनी आपल्या व्यंगचित्रांच्या आधारे मराठी माणूस जागा केला व शिवसेना ही संघटना उभारली. यातून त्यांनी आपली राजकीय कारकिर्द उभी केली. लक्ष्मण यांनी मात्र आयुष्यभर व्यंगचित्रे काढून टाईम्स ऑफ इंडियात नोकरी करणे पसंत केले. राजकीय व्यंगचित्रकार म्हणून त्यांची देशात ओळख होती. तसेच त्यांचा कॉमन मॅन हा देशभर चर्चेचा विषय ठरला होता. त्यांच्या कॉमन मॅनच्या आधारावर त्यांनी समाजात जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. ६० वर्षाहून अधिक काळ त्यांनी व्यंगचित्रकाराची भूमिका पार पाडली. रासीपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण म्हणजेच आर. के. लक्ष्मण यांचा जन्म २३ ऑक्टोबर १९२१ रोजी म्हैसूर येथे झाला. वडील म्हैसूर येथील शाळेत मुख्याध्यापक होते. वडिलांच्या शाळेसाठी अनेक नियतकालिके त्यांच्या घरी येत असत. लक्ष्मण यांना त्यांतील विविध विषयांवरील चित्रे पाहण्यात रस होता. तशी चित्रे आपणही काढून पाहावी असे त्यांना वाटू लागल्याने लक्ष्मण चित्रे काढू लागले. अगदी सुरुवातीच्या काळात लक्ष्मण यांची चित्रे स्थानिक वर्तमानपत्रातून छापून येऊ लागली. मुंबईमधील जे.जे. स्कूल ऑफ आट्‌र्स येथे शिकण्यासाठी लक्ष्मण यांनी अर्ज केला होता, पण तेथे त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. मग आर.केंनी म्हैसूरच्या विद्यापीठातून बी.ए.ची पदवी संपादन केली. पुढे लक्ष्मण पदवीधर झाल्यावर नोकरी मिळविण्यासाठी दिल्लीला गेले. हिंदुस्थान टाइम्स या वृत्तपत्राने लक्ष्मण यांचे वय कमी असल्याचे कारण पुढे करून नोकरी नाकारली. मग काही काळ ब्लिट्‌झ मध्ये आणि नंतर फ्री प्रेस जर्नल मध्ये लक्ष्मण यांनी काम केले. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे फ्री प्रेसमध्ये व्यंगचित्रकार म्हणून काम करीत असत. मात्र कम्युनिस्टांची टवाळी करायची नाही असा फ्री प्रेसच्या मालकांचा दंडक होता. म्हणून त्यांनी फ्री प्रेसची नोकरी सोडली. त्यानंतर अर्धशतकभर ते टाइम्स ऑफ इंडियामध्ये व्यंगचित्रे काढत होतेे. टाईम्सचे व्यवस्थापन आपल्या कोणत्याही कर्मचार्‍याला वयाच्या साठीनंतर कामावर ठेवत नाहीत. मात्र त्यांनी या नियमाला अपवाद करुन लक्ष्मण यांना निवृत्तीचे वय वाढवून दिले होते. लक्ष्मण यांचे मोठेपण यातून दिसते. त्यांनी टाईम्समध्ये यू सेड इट नावाने त्यांनी फक्त व्यंगचित्र असलेले एक सदर सुरू केले. दैनिकाच्या मुखपृष्ठावर नियमितपणे प्रकाशित होत असलेले हे सदर लोकांना खूप आवडते. लक्ष्मण यांनी देश-विदेशांतील थोरामोठ्यांची व्यंगचित्रे काढली. त्यांचे कॉमन मॅन नावाचे सर्वसामान्य माणसाचे व्यंगचित्र विशेषच म्हणावे लागेल. हा कॉमन मॅन जसा आधी होता तसाच शेवटपर्यंत राहिला. चौकड्याचा कोट, धोतर, टोपी असा त्याचा साधा पोषाख आहे. लक्ष्मण यांनी असंख्य व्यंगचित्रे काढली आहेत पण त्यांनी कधीही या माध्यमाच्या आडून कोणास दुखावले नाही किंवा कोणाच्या व्यंगावर चित्रे काढली नाहीत. घटनांचे अचूक टिपण, उत्तम निरीक्षण, बुद्धिमत्ता, आत्मविश्वास याच्या जोरावर लक्ष्मण यांची व्यंगचित्रे सहजच लक्षात राहतात. आसपासच्या घटना मिस्किलपणे दाखवीत असल्याने लक्ष्मण यांची चित्रे खास आहेत. त्यांच्यावर तोचतोचपणाचे आरोपही झाले, पण त्यांनी कधी चिडून कोणाला उत्तर दिले नाही. लक्ष्मण यांचा कॉमन मॅन सगळ्यांना इतका आवडतो की त्याचा एक पूर्णाकृती पुतळाही बनविण्यात आला आहे. त्यांच्या निवडक व्यंगचित्रांची पुस्तकेही प्रसिद्ध झाली आहेत. तसेच लक्ष्मण यांनी एशियन पेन्ट्‌ससाठी काढलेले गट्टूचे चित्रही लोकप्रिय आहे. व्यंगचित्रांबरोबर आर. के. लक्ष्मण यांनी कथालेखन व कादंबरीलेखनही केले. लक्ष्मण यांचे थोरले भाऊ प्रसिद्ध लेखक आर. के. नारायण यांचा लक्ष्मण यांच्या जडणघडणीत मोलाचा वाटा आहे. आर. के. लक्ष्मण यांनी त्यांच्यासाठीही बरीच व्यंगचित्रे काढली. तसेच इतर अनेक लेखकांसाठी व्यंगचित्रे काढली आहेत. नारायण यांनी मालगुडी या काल्पनिक गावाच्या पार्श्वभूमीवर अनेक कथा लिहिल्या. त्यांच्या कथा दैनिक हिंदू मधून प्रसिद्ध होत असत. या कथांसाठी लक्ष्मण यांच्याकडूनच ते चित्रे काढून घेत असत. सरावाने आर.के. लक्ष्मण अधिकाधिक चांगली चित्रे काढू लागल्यामुळे इतर लेखकही त्यांच्याकडून चित्रे काढवून घेऊ लागले. प्रारंभीच्या काळात त्यांनी हिटलर, मुसोनिली, नेहरू, गांधी अशा प्रसिद्ध व्यक्तींची व्यंगचित्रे काढली होती. इतका दीर्घकाळ व्यंगचित्रे काढणारा हा बहुधा एकमेव व्यंगचित्रकार असावा. त्यांचा कॉमन मॅन गेल्या पन्नास वर्षातील देशातील राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक घडामोडींचा-उलथापालथीचा साक्षीदार आहे. आर. के. लक्ष्मण यांची व्यंगचित्रांमध्ये प्राजंळपणाचंही दर्शन घडते. मात्र एखाद्या व्यक्तीचे व्यंग्य दर्शवणारी व्यंगचित्रे त्यांनी काढली नाहीत, किंवा कोणाला दुखावण्यासाठीही त्यांनी त्यांच्या कुंचल्याचा वापर केला नाही. जवाहरलाल नेहरु, महात्मा गांधीपासून अटलबिहारी वाजपेयी, सोनिया गांधीपर्यंत राजकीय व्यक्तींच्या अनेक पिढया त्यांनी रेखाटल्या आहेत. एका साध्या रेषेतून या नेत्याचे व्यक्तिवैशिष्ट्ये स्पष्ट करण्याची विलक्षण हातोटी त्यांच्याकडे होती. त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार लाभले. त्यात पद्मभूषण (१९७१), पद्मविभूषण (२००५), रॅमन मॅगसेसे पुरस्कार (१९८४) आदी पुरस्कार मिळाले. असा कलाकार पुन्हा होणे नाही.
---------------------------------------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel