-->
संपादकीय पान बुधवार दि. १७ डिसेंबर २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
अस्मितेला मानवंदना
छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड किल्ला या महाराजांच्या राजधानीच्या ठिकाणी दररोज पोलिसांकडून मानवंदना दिली जात होती. ही मानवंदना म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राच्या शौर्यशाली इतिहासाला मानाचा दिलेला तो मुजरा होता. परंतु राज्यकर्त्यांनी नेहमीच छत्रपतींच्या नावाने राजकारण करीत राज्य केले मात्र शिवाजी महाराजांना विसरण्याचा धंदा या राज्यातील राज्यकर्त्यांनी नेहमीच केला. छत्रपतींचा आचार-विचार अंमलात आणणे ही बाब दूरच राहो परंतु रोजची त्यांना मानवंदना देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासही हे सरकार विसरले होते. यासंबंधीचे वृत्त कृषीवलने सर्वात प्रथम छापून राज्यकर्त्यांच्या झोपा उडविल्या होत्या. आता आमदार जयंतभाई पाटील यांनी ही मानवंदना पुन्हा सुरु करावी अशी विधानपरिषदेत जोरदार मागणी केली आणि शेवटी छत्रपतींचे आम्हीच वारसदार आहोत असे सांगणार्‍या राज्यकर्त्यांना या मागणीपुढे नतमस्तक होऊन ही मानवंदना सुरु करीत असल्याची मागणी पूर्ण करणे भाग पडले. शिवाजी महाराजांना रोजची मानवंदना देणे म्हणजे मराठी अस्मितेला, जाज्वल्य असलेल्या इतिहासाला मानवंदना देणे होय. रायगड जिल्हा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाते अतिशय जवळचे आहे हे आता नव्याने सांगण्याची काही जरुरी नाही. स्व. प्रभाकर पाटील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना त्यांनी रायगडावर समाधीची पुजा करुन त्याचा प्रसाद शिवभक्तांना पाठविण्याची व्यवस्था केली होती. त्यासाठी त्यांनी स्वतंत्र रायगड पूजा निधी समिती स्थापन केली होती. या समितीच्या माध्यमातून पूजा केली जात असे, ही पूजा देखील बंद आहे. आता निदान सरकारने मानवंदना सुरु केली हे बरे झाले. त्यामुळे राज्यातील शिवभक्तांना निश्‍चितच समाधान वाटेल. रायगड हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध ऐतिहासिक किल्ला आणि शिवछत्रपतींनी स्थापलेल्या हिंदवी स्वराज्याची राजधानी. महाडच्या उत्तरेस २५ किमी. वर व जंजिर्‍याच्या पूर्वेस ६५ किमी. वर सह्याद्री पर्वतश्रेणींत ५.१२५ चौ. किमी. घोड्याच्या नालाप्रमाणे आकार असलेल्या पठारावर वसला आहे. त्याची समुद्रसपाटीपासून उंची ८४६ मी. आहे. सभोवती सांदोशी, छत्री निजामपूर, वाघेरी, वाडी, पाचाड असे खेड्यांचे गट दिसतात. रायरी हे या टेकडीचे जुने नाव. पाश्चात्त्य लोक त्याचा उल्लेख पूर्वेकडील जिब्राल्टर असा करीत. ईशान्येकडील लिंगाणा, पूर्वेकडील तोरणा, दक्षिणेकडील कांगोरा चांभारगड-सोनगड, वायव्येकडील तळेगड व उत्तरेकडील घोसाळगड या किल्ल्यांची रायगडाभोवती संरक्षणाची फळी उभी राहिली. हे जाणूनच शिवाजी महाराजांनी तेथे राजधानी केली. रायगडविषयी अनेक कथा, दंतकथा-वदंता प्रचलित आहेत. शिवाजी-संभाजी यांच्या कारकीर्दीत येथे इंग्रज, डच, पोर्तुगीज इ. वकिलांनी भेट देऊन या किल्ल्‌याचे वर्णन लिहून ठेवले आहे. बाराव्या शतकात रायरी हे मराठे पाळेगारांचे निवासस्थान होते. चौदाव्या शतकात या पाळेगारांनी विजयानगरचे मांडिलकत्व पतकरले. इ. स. १४३६ मध्ये दुसर्‍या अलाउद्दीन बहमनीशाहने तो आपल्या ताब्यात घेतला. इ. स. १७४९ मध्ये अहमदनगरच्या निजामशाहने रायरी आपल्या ताब्यात घेतली. याकुत इस्तंबोली हा त्यांचा किल्लेदार असतानाच आदिलशाहीच्या वतीने हैबतखानाने रायरीवर हल्ला केला आणि आसपासच्या प्रदेशांसह किल्ला जिंकला. त्याने राजे पतंगराव यास किल्लेदारी दिली. पुढे मलिक जमरून हा हवालदार झाला (१६२१). पुन्हा हा किल्ला निजामशाहीत गेल्याचे दिसते. मोगलांनी निजामशाही नष्ट केल्यानंतर आदिलशाहाशी झालेल्या करारानुसार रायरी आदिलशाहीकडे आली (१६३६). आदिलशाहने १६३६ ते १६४४ दरम्यान जंजिर्‍याच्या सिद्दी घराण्यातील इब्राहीम, सय्यद कब्बरी व शेख अली यांना हवालदारीचे हक्क दिले. नंतर चंद्रराव मोरे यांच्याकडे रायरी आदिलशाहीतर्फे गेली. शिवाजी महाराजांनी जावळी जिंकून १६५६ च्या सुमारास चंद्रराव मोर्‍यांकडील सर्व किल्ले काबीज केले. त्यात रायरी १५ एप्रिल ते १४ मे १६५६ दरम्यान त्यांच्या हाती आली असावी. त्यानंतरच शिवाजी महाराजांनी रायरीचे रायगड असे नाव ठेवले आणि राजधानी करण्याच्या दृष्टीने कल्याणचा सुभेदार आबाजी सोनदेव यास इमारतींची डागडुजी, नव्या इमारती बांधणे, सुरक्षिततेसाठी तटबंदी उभारणे, पाणी पुरवठ्याची व्यवस्था करणे इ. कामे सोपविली. महाराजांनी तिथे तीन-चार वर्षांत लहानमोठ्या तीनशे वास्तू बांधण्यात आल्या. शिवाजी महराजांनी १६६२ मध्ये कायमच्या राजधानीसाठी रायगडची निवड केली; तथापि १६७० पर्यंत येथे राजधानी हलविण्यात आली नव्हती. १६७४ मध्ये महाराजांचा राज्याभिषेक याच वास्तूत झाला. त्यांच्या मृत्यूनंतर १६८९ पर्यंत तो छत्रपती संभाजीच्या ताब्यात होता. पुढे मोगलांनी तो घेतला (१६८९) आणि नंतर पुन्हा मराठ्यांनी घेतला (१७३५); परंतु त्याचे वैभव नष्ट झाले. उत्तर पेशवाईत तो राजकीय कैद्यांच्या बंदिवासाचे ठिकाण होते. नाना फडणीस व दुसरा बाजीराव यांनी पडत्या काळात सहकुटुंब त्याचा आश्रय घेतला. नाना फडणीसाने १७९६ मध्ये काही इमारतींची डागडुजी केली. मराठ्यांचा पराभव करून ब्रिटिश लष्करी अधिकारी कर्नल प्रॉथरने १० मे १८१८ रोजी रायगड जिंकून घेतला. त्यावेळच्या तोफांच्या मार्‍यात अनेक इमारती पडल्या. त्यानंतर शिवजयंती उत्सवानिमित्त १८९७ मध्ये लाकमान्य टिळकांनी लोकजागृतीसाठी या ऐतिहासिक वास्तूला पुन्हा उजाळा दिला. आता ते पर्यटकांचे एक प्रेक्षणीय स्थान झाले आहे. नगारखाना, मनोरे, बुरूज, मंदिरे इ. काही तुरळक वास्तू वगळता रायगडावरील बहुतेक इमारती आज नष्ट झालेल्या आहेत. त्यांचे भग्न अवशेष इतस्ततः विखुरलेले असून त्यांतून वास्तूंच्या भव्यतेची कल्पना येते. आज रायगडाची ही दुरावस्था पाहून कोणासही वाईट वाटेल. पर्यटक येतात आणि येथे कचर्‍याचा ढीग करुन जातात. रायगडावर मानवंदना सुरु झालेली असताना या किल्याची डागडुजी करुन गतवैभव आपले जपले पाहिजे. तसेच येथे कायमस्वरुपी स्वच्छता राहावी यासाठी यंत्रणा उभारण्याची गरज आहे.
------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel