-->
संपादकीय पान मंगळवार दि. २१ ऑक्टोबर २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
सरकार स्थापनेचा दिवाळी धमाका
--------------------------------------------
निवडणुकांनंतर सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता महत्वाचा प्रश्‍न पडतो तो म्हणजे सरकार भाजपाचेच येणार हे नक्की झाले असले तरीही त्या सरकारला कोण पाठिंबा देणार हे अद्याप नक्की झालेले नाही. भाजपाला बाहेरुन पाठिंबा देण्याचे राष्ट्रवादीने यापूर्वीच जाहीर करुन सत्तेच्या राजकारणात आघाडी घेतली आहे. अर्थात ही शरद पवारांची राजकीय खेळी कुणाच्या लक्षात आली नाही असे म्हणणे चुकीचे ठरेल. शिवसेनेने मात्र आपला अजूनही भाजपावरचा रुसवा काही सोडलेला नाही. उध्दव ठाकरे यांनी भाजपाला पाठिंबा देण्यासाठी अटी घालण्यास सुरुवात केल्याने भाजपा त्यांचा पाठिंबा घेईलच कशाला असा प्रश्‍न उपस्थित होतो. एकूणच सध्या राजकीय घडामोडींना वेग आला असून या घडामोडी नेमक्या कुठे नेऊन थांबणार याचा अजूनही थांगपत्ता लागत नाही. मतदानातील टक्केवारी तरी हेच दाखवते की, भारतीय जनता पक्षाला मोठे यश मिळाले असले, तरीही त्यांना एकूण मतांपैकी केवळ २७% मते मिळाली आहेत. याचाच अर्थ असा की, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र झाले असते, तर त्यांनी या दोन्ही पक्षांना तिरंगी शर्यतीत अडकवले असते व स्वत: वरचढ ठरले असते. पण तसे झाले नाही. सोनिया गांधी यांना आघाडी कायम राहावी असे वाटत होते; पण महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसला ते नको होते. यावरून असे लक्षात येते की, भाजप जेवढा त्यांचा नावडता आहे त्याहीपेक्षा अधिक त्यांना एकमेकांचा तिरस्कार आहे. महाराष्ट्रातील यश भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने केवळ चांगलेच नाही, तर तो महत्त्वपूर्ण  विजय आहे. भाजपला आणखी काही जागा मिळाल्या असत्या, तर शिवसेनेपासून त्यांना कायमची मुक्ती मिळाली असती. पण हे घडायचे नव्हते. अर्थातच महाराष्ट्रातील सर्वाधिक आमदार आपल्या पक्षाचे असल्याचे सिद्ध केले आहे. युतीमध्ये आम्हीच थोरले भाऊ आहोत, हा उद्धव ठाकरेंचा दावाही फोल ठरवला आहे.  युती तुटल्यामुळे भारतीय जनता पक्षाला चांगले उमेदवार शोधायला  कमी कालावधी मिळाला. भविष्यात अधिक चांगल्या कामगिरीची अपेक्षा करता येईल. शिवसेनेचा युतीमधील थोरल्या भावाचा दर्जा आता संपुष्टात आला आहे. भाजपला त्यांची गरज आहे; पण ती आता पाठिंबा घेण्यापुरतीच. शिवसेनेला यावेळी केवळ १९.०३ टक्के मते मिळाली, ती गेल्या विधानसभेच्या तुलनेत तीन टक्क्यांनी वाढली.  मुंबईत भाजपने शिवसेनेपेक्षा अधिक जागा जिंकून त्यांच्यावर मात केली आहे. शिवसेनेच्या दृष्टीने ही धोक्याची घंटा आहे.  आता जरी भाजप-शिवसेना सरकार स्थापन करायला एकत्र आले तरी त्यांच्या संबंधांमध्ये कायम कटुता व अस्वस्थता राहील. शिवसेना मुंबई हा आपला गड असल्याचे सांगत आली आहे. मात्र हा गड आता राहिलेला नाही. त्यावर भाजपाने आक्रमण करुन मोठी तोडमोड केली आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या लग्नाशी त्यांचे साम्य असेल. या दोन्ही पक्षांमध्ये धुसफूस होत राहील. या निवडणुकीत प्रचारामध्ये शिवसेनेने भारतीय जनता पक्षाच्या विरोधात वापरलेली टीकेची भाषा पाहता ही युती कशी राहील, हे स्वच्छ आहे. ती अस्वस्थच असणार आहे. भाजपला त्यांच्यापासून मुक्त व्हायचे आहे, याची जाणीव टोचत राहील आणि भाजपला या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकल्यामुळे आपण मोठे भाऊ आहोत असा त्यांचा ताठा असेल. एकंदरीत भाजप या विजयामुळे राज्यात आपला विस्तार वाढवण्यावर भर देईल. शिवाय राज्यात हिंदुत्ववादी विचारधारा नेणारा आपलाच पक्ष आहे, असे राजकारण तो करेल. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने जरी काही जागा गमावल्या असल्या, तरी त्यांची स्थिती चांगली आहे. ते शिवसेनेला भागीदारीची ऑफर देऊ शकतात किंवा प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काम करू शकतात. कॉंग्रेसशी त्यांना मैत्री जोडणं सहज शक्य आहे. शरद पवार मात्र देशभरात कॉंग्रेस कशी कोसळते याकडे लक्ष देत असल्याने आणि केंद्रात, राज्यात कुठेही त्यांच्याशी युती नसल्यामुळे ते नवे पर्याय शोधत राहतील. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे एक राजकीय पक्ष म्हणून आकड्यांच्या संदर्भात आधीच निकालात निघालेले होते. आता केवळ एक जागा मिळाल्याने व त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांकडून राज ठाकरे यांच्यावर हिंसक राजकारण करण्याचा दबाव येऊ शकतो. महाराष्ट्रातील सगळ्यांसाठीच ही चिंताजनक गोष्ट असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीने हा निकाल त्यांच्या राजकारणाचा विजय आहे. त्यांच्या विजय पताकांमध्ये आणखी एका पताकेची भर पडली आहे. काही जण म्हणतील की, हरियाणा जिंकले; पण महाराष्ट्रात पूर्ण बहुमत म्हणजे मोठा विजय मिळवता न आल्याने भाजपसाठी ही परिस्थिती थोडीशी निराशाजनकच आहे; पण मोदी या विजयाकडे असे पाहणार नाहीत. महाराष्ट्रात शिवसेनेशी युती तोडण्याचा जुगार त्यांनी खेळून दाखवला आणि हा जुगार खेळताना त्यांनी त्या वेळी असा नक्कीच विचार केला असणार की गांधी कुटुंबीय महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा फायदा उठवण्याइतके हुशार किंवा समंजस नाहीत. खरे तर मोदींचा अश्वमेध रोखण्याची मोठी संधी सोनिया गांधी यांना होती. मोदी म्हणजे काही अभेद्य ताकद नव्हे, हे दाखवण्याची त्यांना चांगली संधी होती; पण हा प्रयत्न त्यांच्याकडून झाला नाही. तिथे कॉंग्रेस अडखळली. आता सरकार स्थापनेची दिवाळी सुरु झाली आहे. फटाके वाजू लागले आहेत.
----------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel