-->
संपादकीय पान शुक्रवार दि. २९ ऑगस्ट २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
बाप्पा यांना बुध्दी दे ...
-----------------------------------
गणेशोत्सव म्हणजे आनंदाचे डोही आनंद तरंग... आनंदाच्या तळ्यात आनंदाचेच तरंग उठतात तसेच या काळात आनंदाच्या सागराला आनंदाचे भरते येते. उसळणार्‍या या भक्तीच्या लाटेत लोक न्हाऊन निघतात. गणेश, गणपती, गणराय, बाप्पा कुठल्याही नावानं साद दिली तरी ही देवता प्रतिसाद देते म्हणूनच आपलीशी वाटते. या उत्सवाचे दिवस चराचरात जाणवतात. हे मंगलमय दिवस कधीच संपू नयेत असं वाटतं... गणपती बाप्पा मोरया चा गजर करत गुंजणार्‍या ललकार्‍या, प्रौढांच्या पूजा-आरतीनं भारावलेलं वातावरण, ज्येष्ठांच्या धीरगंभीर मंत्रोच्चारानं त्यात आलेलं आगळं गांभिर्य हे सर्व वातावरण अनोखा उल्हास देणारं... चैतन्य निर्माण करणारं... आजपासून दहा दिवस हेच चैतन्य अनुभवायला मिळणार आहे. सर्वांच्या लाडक्या गणरायाचं अधिराज्य अनुभवण्याचं सुख अनुभवायला मिळणार आहे. म्हणूनच नेहमीच्या थकवणार्‍या दिनक्रमातून आराधना आणि पूजाअर्चा करण्याची संधी देणारे हे दिवस मर्मबंधातील ठेव होऊन राहतात. ही ठेव आयुष्यभर जपली जाते. विद्या, शक्ती, बुद्धीची ही देवता अगदी लहानपणापासून सर्वांच्या परिचयाची. आबालवृद्धांना या देवतेचं आकर्षण आहे. कितीही ऐकलं तरी या देवतेविषयी आणखी ऐकावंस वाटतं. त्याचं वर्णन श्रुती सुखावतं राहतं. गणेशाविषयी सांगावं, बोलावं आणि लिहावं तेवढं थोडंच. श्री गणेशाचं आदिकाळापासून रुप बघायचं तर त्याचे चार टप्पे आहेत. निर्माणकाळात बृहस्पती, ब्रम्हणस्पती आणि इंद्र या देवतांशी श्री गणेशाची एकरुपता मानली जाणं हा श्री गणेश दर्शनाचा पहिला टप्पा. श्री गणेश आणि विनायक या देवता आदिकाळात भिन्न होत्या असं म्हटलं जातं. या देवतांच एकीकरण म्हणजे एक स्वरुप हा दुसरा टप्पा. श्री गणेश किंवा श्री विनायक ही नावं वेगळी-वेगळी म्हटली तरी, या दोन्ही नावांनी श्री गणेशाचंच रुप डोळ्यापुढे यावं, हा श्री गणेशाचा तिसरा टप्पा. गजमुख किंवा गजवदन अशा स्वरुपाची हत्तीचं तोंड असलेली श्री गणेशाची मूर्ती पूजेसाठी वापरली जाणं, हा श्री गणेश दर्शनाचा आजचा चौथा टप्पा. सध्या आपण अशाच मूर्तिची पूजा करतो. वेदांच्या काळात ऋग्वेदात गणपती या शब्दाचा उल्लेख आढळतो. गणानात्वा गणपति हवामहे श्री गणपती अथर्वशीर्षात, गणेशाला उद्देशून त्वं इंद्रस्त्वं अग्निः (तूच इंद्र आहेस आणि तूच अग्नीही आहेस) अशी स्तुतीही आहे. शुक्ल यजुर्वेदात नमो गणेभ्यो गणपतिश्यश्‍च वो नमः असा अनेक गणपतीचा उल्लेख असणारा मंत्र आहे. आजही हे मंत्र कानी पडतात अत्यंत प्रसन्नता देऊन जातात. वेद आणि उपनिषद या नंतर मुद्गलपुराण हा श्रीगणेश सांप्रदायातील त्या मानाने अर्वाचीन ग्रंथ आहे. यामध्ये बत्तीस प्रकारच्या गणपतीमूर्तीचे वर्णन आहेत. इसवी सन ५०० ते ६०० च्या सुमाराला भमरा येथील शक्तिगणपती आणि मथुरा येथील स्थानक गणपतीचे उगम आढळतात. इसवी सनच्या आठव्या-नवव्या शतकात नेपाळ आणि तिबेटमध्येही श्रीगणेशाची उपासना प्रचलित होती असं दिसून येतं. गणपतीची वाहनं अनेक तशीच त्याच्या हातामधली शस्त्रही वैशिष्टपूर्ण आहेत. गणपती हा शंकराच्या गणांमधील एक असल्याने त्रिशूल हे गणपतीचं एक शस्त्र ठरलं. हा त्रिशूल प्रत्यक्ष शंकरानीच गणपतीला दिला. परशू हे शस्त्र मूळ परशुरामाचं. परंतु रेणुकामातेने श्रीगणेशाला ते उपनयन म्हणजे मुंजीच्या वेळी दिलं अशी पुराण कथा आहे. मुद्गल हे गणपतीच्या हातात अभावाने दिसणारं शस्त्र, तर पाश आणि अंकुश ही नेहमी दिसणारी शस्त्र आहेत. गणपतीच्या एका हातातील कमळाचा उपयोग शस्त्राप्रमाणे करुन त्याने एका राक्षसाचा वध केल्याचाही उल्लेख आढळतो. कलियुगात प्रत्येकाला हवं ते देणारी आणि सर्वकाळ दातृत्त्वाची जबाबदारी पार पाडणारी देवता म्हणजे गणपती. सध्याच्या काळात गणपती बाप्पाला आपल्याकडील समाजविघातक शक्तींना चांगली बुध्दी देण्यास सांगण्याची वेळ आली आहे. कारण आपल्याकडे गेल्या काही वर्षात अपप्रवृंचा फैलाव झपाट्याने झाला आहे. सर्व काही बाबी आर्थिक निकषांवर तोलल्या-मोजल्या जाऊ लागल्या आहेत. यातून माणूसकी मागे पडत आहे. भ्रष्टाचार हा पावलोपावली बोकाळला आहे. त्यातून सर्वसामान्यांचे जीनव कठीण होऊन बसले आहे. आता नुकत्याच तीन महिन्यांपूर्वी लोसकभा निवड़णुका जाल्या. त्यात भ्रष्टाचार व महागाईला आळा घालण्याचे आश्‍वासन नरेंद्र मोदींनी दिले होते. आता मात्र पंतप्रधानपदी सत्तेत बसल्यावर नरेंद्रभाई आपले हे आश्‍वासन विसरल्यासारखे झाले आहेत. तर बाप्पा आता याची आठवण नरेंद्र मोदींना करुन देण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. कारण पूर्वी नरेंद्रभाई सर्वांना भेटायला मोबाईलपासून टी.व्ही.वर यायचे. आता त्यांचे कुठेच दर्शन होत नाही. गेल्या तीन महिन्यांत त्यांची चार विदेशवार्‍या केल्या. पुढील दीड महिन्यात आपल्या राज्यातही विधानसभेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. प्रत्येकाला मुख्यमंत्री होण्याची उमेद आहे. पण राज्याच्या विकासासाठी आपण या राज्याचे नेतृत्व करु असे कुणाला वाटत नाही हे जे दुख आम्हाला वाटते तेच दुख बाप्पा तुम्हाला असणार. त्यामुळे मुख्यमंत्री कुणाला करायचे हे आम्ही तुमच्यावरच सोपवितो. गणपती बाप्पा कोकणातील आमचा चाकरमनी मोठ्या-मोठ्या खड्यातून प्रवास करुन तुमच्या पायाशी आलेला आहे. यंदा कोकण रेल्वेनेही त्याचा घात केलाय. मात्र पुढील दोन वर्षात रस्ता चार पदरी पूर्ण करण्याचे आश्‍वासन नितीन गडकरींनी जे आश्‍वासन दिले आहे त्यांच्या प्रयत्नांना बाप्पा तुम्ही बळ द्या. बाप्पा आता या भूतलावरच्या प्रत्येकाला सुबुध्दी देण्याची गरज निर्माण झाली आहे. बाप्पा त्याची सल तुमच्या मनात आहेच. लोकमान्य टिळकांनी तुम्हाला घरातून सार्वजनिक ठिकाणी आणले व स्वातंत्र्याचे स्पुलिंग जागृत केले. आता बदलत्या काळात तुम्हाला नवीन भूमिका बजावायची आहे व लोकांचे जीवन सुखकर कसे होईल यासाठी सुबुध्दी द्यावयाची आहे...
---------------------------------------------------  

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel