-->
संपादकीय पान बुधवार दि. ३० जुलै २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
कॉँग्रेसचे बुरे दिन
--------------------------------------
लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर कॉँग्रेस अजून काही सावरु शकलेली नाही. कॉँग्रेस सत्ते असताना असलेल्या पुरोगामी लोकशाही आघाडीतील त्याचे अनेक साथीदार पक्ष त्यांची साथ सोडल्यात जमा आहेत. नवीन पक्ष सध्यातरी जोडले जाण्याची शक्यता नाही. सत्ता गेल्यामुळे तमाम कॉँग्रेसजनांमध्ये धुसफूस आहेच. तत्यामुळे कॉँग्रेसला सध्यातरी अच्छे दिन येण्याची शक्यता नाहीच. उलट बुरे दिन लांबण्याचीच चिन्हे दिसत आहेत. इफ्तार पार्टीचे निमित्त करुन आपल्याला काही नवीन राजकीय समीकरणे बांधता येतात का त्याची चाचपणी करण्यासाठीच ही पार्टी झाली. परंतु त्यात फारसे यश सोनिया गांधींना आलेले नाही. वास्तविक गेली तीन वर्षे सोनिया गांधी यांनी देशातील विविध नैसर्गिक आपत्तींच्या कारणास्तव सत्तेत असूनही अशी पार्टी आयोजित केली नव्हती. पण २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या नरेंद्र मोदींच्या लाटेच्या विजयात कॉंग्रेसची जी काही धुळधाण उडाली होती ती इतकी जबरदस्त होती की, या पक्षाला विरोधी पक्ष नेतेपद मिळेणेही अशक्य ठरले. अशा या उद्ध्वस्त घराची डागडुजी लवकर करून ते घर पुन्हा दिमाखात उभे राहणे अवघड आहे; पण घरदुरुस्ती मात्र अपरिहार्य आहे. ही घरदुरुस्ती म्हणजे समविचारी पक्षांना पुन्हा एकत्र आणणे. सत्तेच्या राजकारणात मुरलेली कॉंग्रेस याबाबतीत खरे तर एकदम तय्यार आहे, त्यांना चांगलाच अनुभव आहे. पण या इफ्तार पार्टीत कॉंग्रेसचे नेते वगळता जनता दल(सं.)चे अध्यक्ष शरद यादव, राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव हे दोनच नेते हजर होते. यातून एक बाब स्पष्ट आहे की, देशातील सर्वच छोट्या-मोठ्या प्रादेशिक, राष्ट्रीय राजकीय पक्षांना कॉंग्रेसची गरज आता पडेनाशी झालेली आहे. वास्तविक कॉंग्रेसने गेल्या दहा वर्षांत यूपीए आघाडी बांधताना दक्षिणेतील प्रमुख पक्ष द्रमुकपासून जम्मू आणि काश्मीरमधील प्रमुख पक्ष नॅशनल कॉन्फरन्सपर्यंत, पूर्वेतील डावे पक्ष - तृणमूल कॉंग्रेसपासून पश्चिम भारतातील राष्ट्रवादी कॉंग्रेसपर्यंत, मायावतींची बहुजन समाज पार्टी- मुलायमसिंह यांच्या समाजवादी पार्टीपासून आंध्रातील तेलंगण राष्ट्र समितीपर्यंत सर्वच प्रमुख पक्षांची राजकीय मोट बांधली होती. या पक्षांच्या रुसव्याफुगव्यांचे लाड पुरवित कॉंग्रेसने दहा वर्षे राज्य केले, पण या कालावधीत भ्रष्टाचाराचे असंख्य आरोप व जनतेशी असलेला संपर्क तुटल्यामुळे कॉंग्रेसची अन्य पक्षांच्या तुलनेत प्रतिमा इतकी काळवंडली की, एका देशव्यापी पक्षाचा जनाधार झपाट्याने खाली येऊन त्यांचे लोकसभेतील संख्याबळही ४४ वर आले. या खालावलेल्या संख्याबळामुळे कॉंग्रेसची देशाच्या राजकारणातील राजकीय किंमतही शून्यवत होऊन बसली. याचे पडसाद या पार्टीट उमटले आहेत. या पार्टीत मायावती, मुलायमसिंह, शरद पवार, ओमर अब्दुल्ला, अजितसिंग किंवा डाव्या पक्षांचे नेते असे दिग्गज नेत्यांपैकी कुणीच हजर नव्हते. ते उपस्थित असते तर कॉंग्रेस पक्षाची देशाच्या राजकारणात अजूनही गरज आहे, असा संकेत पोहोचला असता. पण तसे काहीच झाले नाही. कॉंग्रेसच्या प्रवक्यांनी अन्य पक्षांच्या गैरहजेरीबद्दल थातूरमातूर स्पष्टीकरण दिले खरे पण त्यातून कॉँग्रेसला बुरे दिनच आहेत हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. सध्या कॉंग्रेस राजकीयदृष्ट्‌या इतकी एकाकी पडत चालली आहे की, संसदेतही प्रमुख विरोधी पक्षाच्या मुद्द्यावरून त्यांच्या समर्थनासाठी किंवा त्यांच्याशी हातमिळवणी करण्यासाठी एकही पक्ष पुढे आलेला नाही. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता, बिजू जनता दल कॉंग्रेसच्या मागे उभे राहतील असे वाटत होते; पण त्यांनीही या वादातून सोयीस्कर माघार घेतली आहे. तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्ष व प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही त्यांच्या राज्याला विशेष आर्थिक पॅकेज मिळेल, अशा आशेपायी कॉंग्रेसला संसदेत कोणतेच समर्थन न करण्याचा विडाच उचलला आहे. एकंदरीत सर्वच पक्षांनी संसदेत व संसदेबाहेर कॉंग्रेसला वाळीत टाकण्याचे केलेले हे प्रयत्न राजकीयदृष्ट्‌या महत्त्वाचे ठरतात. या पार्टीत एकमेकांचे कट्टर शत्रू शरद यादव व लालूप्रसाद यादव हे दोन नेते उपस्थित असले तरी या दोघांचा घरोबा किती काळ चालेल, हा प्रश्नच आहे. या दोघा यादव नेत्यांना बिहारमधील भाजपची वाढती शक्ती रोखण्यासाठी कॉंग्रेसची गरज आहे व कॉंग्रेसलाही आपले अस्तित्व टिकवण्यासाठी या दोघांची गरज वाटू लागली आहे. २००४ मध्ये लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने भाजपला रोखण्यासाठी सोनिया गांधी यांनी जयललिता यांच्यापासून मुलायमसिंह, मायावती, करुणानिधी यांच्याशी शिष्टाई केली होती व ही देशव्यापी राजकीय आघाडी उभी केल्यामुळे एनडीए आघाडीला पराभवाला सामोरे जावे लागले होते. आता २०१९ च्या लोकसभा निवडणुका लांब आहेत; पण येत्या काही काळात महाराष्ट्र, हरियाणा, बिहार, प. बंगाल, उत्तर प्रदेशमध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुका कॉंग्रेसच्या अस्तित्वासाठी महत्वाच्या ठरणार आहेत. कॉँग्रेस सध्या सुस्त हत्तीप्रमाणे वावरत आहे. भाजपा काही तर चूक करेल आणि आपण त्यातून सावरु असे त्यांचे गणित असावे. मात्र नरेंद्र मोदी हे अतिशय सावधगतीने पावले टाकीत आहेत. त्यांची आक्रमक हिंदुत्वाची भूमिका त्यांनी सध्यातरी म्यान केलेली दिसते. अशा स्थितीत कॉँग्रेसला पुन्हा एकदा वाढण्यासाठी कोणतेही सबळ कारण दिसत नाही. सरकारने गॅस, रेल्वेच्या दरात वाढ केली खरी परंतु त्याचा फायदा काही कॉँग्रेसला होण्याची चिन्हे दिसत नाहीत. याचे महत्वाचे कारण म्हणजे कॉँग्रेसच्या विरोधात एवढे जनमत तयार झाले आहे की ते एवढ्यात निवळणे कठीण आहे. इफ्तार पार्टीच्या निमित्ताने सोनिया गांधींनी सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला खरा परंतु त्यात त्यांचे पुरते हसे झाले. त्यामुळे कॉँग्रेसचे बुरे दिन एवढ्यात काही संपणार नाहीत हेच खरे.
-----------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel