-->
संपादकीय पान गुरुवार दि. २४ मार्च २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------
तटकरेसाहेब, आपले आव्हान स्वीकारले!
-----------------------------
रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री, जलसंपदामंत्री व राष्ट्रवादीचे रायगड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुनिल तटकरे यांनी भ्रष्टाचारातून २५ हजार कोटी रुपयांची माया जमविल्याप्रकरणी आम्ही जी श्‍वेतपत्रिका प्रसिध्द केली होती त्याला उत्तर म्हणून सुनिल तटकरे यांचे वकिल व्ही.ए. गांगल यांनी १०० कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्याची मागणी करणारी नोटीस आम्हाला बजावली आहे. तटकरेसाहेब आपण दिलेले आव्हान आम्ही स्वीकारले असून आता खरी लढाईला सुरुवात झाली आहे. आमचे वकिल तुमच्या या नोटीशाला सात दिवसांच्या आतच उत्तर देतीलच. मात्र आम्ही काही माफी मागण्याचा प्रश्‍नच येत नाही आणि मागणारही नाही. त्यामुळे तटकरेसाहेब आपण आता न्यायालयात खटला भरण्यासाठी १०० कोटीच्या आपल्या दाव्यातील १० टक्के आगावू रक्कम तयार ठेवा. अर्थात एवढी रक्कम आपण कशी उभी करणार हा आम्हाला प्रश्‍न पडला आहे. कारण आपण निवडणूक आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रानुसार, आपली एकूण सर्व मालमत्ता केवळ दहा कोटी रुपयेच आहे. त्यामुळे या खटल्यासाठी पैसे उभारण्यासाठी बहुदा आपल्याला आपली सर्व मालमत्ता विकण्याची पाळी येणार असेच दिसते. परंतु आपल्याला भ्रष्टाचारमुक्त म्हणून जाहीर करुन घ्यायचे असेल तर हे करावेच लागेल. निवडणुका झाल्यावर तटकरेंना काही दिल्लीला जावे लागणार नाही त्यामुळे ते रायगडात सुतारवाडीला किंवा मुंबईतच असतील. त्यामुळे त्यांच्याकडे न्यायालयीन लढाई करण्यासाठी वेळ भरपूर असेल. अगदी लोकसभेनंतर राज्यात विधानसभेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्यावेळी देखील सध्याच्या सत्ताधार्‍यांना पुन्हा सत्तेची पायरी चढता येणार नाही अशीच आतापासून चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे सुनिल तटकरे यांच्याकडे आता पुढील काळात वेळ भरपूर असेल. असो. केवळ निवडणुका डोळ्यापुढे ठेवून आम्ही ही शेवतपत्रिका काढली असे म्हणणे चुकीचे ठरेल. कारण गेली तीन वर्षे सातत्याने तटकरे यांच्यावरील भ्रष्टाचाराची प्रकरणे असोत किंवा त्यासंबंधीचे न्यायालयीन कामकाज असो कृषीवलनेच सर्वाधिक पाठपुरवठा केला आहे. याविषयीच्या बातम्या पुढाकाराने दिल्या आहेत. आम्ही ज्यावेळी ही शेवतपत्रिका प्रसिध्द केली त्यावेळी आम्हाला जो गावागावातून प्रतिसाद लाभला ते पाहता तटकरे यांच्या भ्रष्टाचाराविरुध्द लोकांमध्ये राग आहे हे आम्हाला उमगले. ज्यावेळी तटकरेंनी आम्हाला १०० कोटी नुकसानभरपाईची नोटीस बजावल्याचे वृत्त प्रसिध्द केले त्यावेळी तटकरे यांच्याच पक्षातील अनेक वकिलांनी स्वत:हून पुढे येऊन आम्ही तुमची केस घेऊ पण हा लढा चालू ठेवा असे  फोन करुन सांगितले. यावरुन तटकरे यांच्या भ्रष्टाचाराबद्दल लोकांमध्ये किती त्वेष आहे ते जाणवते. कृषीवलनेे जी तटकरे यांच्या विषयी माहिती प्रसिध्द केली आहे ती काही मोठे संशोधन करुन किंवा खाजगी गुप्तचर यंत्रणा त्यांच्यामागे लावून मिळविलेली नाही, हे आम्ही सांगू इच्छितो. आम्ही ही सर्व माहिती केंद्र सरकारच्या कंपनी व्यवहार खात्याच्या वेबसाईटवरुन घेतलेली आहे. तटकरे व त्यांच्या कुटुंबियांच्या मालकीच्या ज्या कंपन्या आहेत त्याचा ताळेबंद सरकारी नियमानुसार त्यांना दरवर्षी कंपनी व्यवहार खात्याला सादर करावेच लागतात. हे आर्थिक ताळेबंद सादर झाल्यावर कंपनी व्यवहार खाते जनतेला माहिती उपलब्ध व्हावी यासाठी आपल्या वेबसाईटवर टाकते. अशा प्रकारे कोणही सर्वसामान्य माणूसही त्या वेबसाईटवर गेल्यास ही माहिती सहजरित्या उपलब्ध होते. आम्ही देखील अशाच प्रकारे ही माहिती मिळविली आहे. याच माहितीच्या आधारावर तीन वर्षापूर्वी किरीट सोमय्या यांनी जनहित याचीका न्यायालयात दाखल केली आहे आणि न्यायालयाने ती दाखल करुन घेतली आहे. त्याची रितसर सुनावणी सुरु आहे. ज्यावेळी या वेबसाईटवरुन आपल्या कंपन्यांची माहीती घेऊन पुरावे न्यायालयात सादर केले जात आहेत हे सुनिल तटकरेंच्या लक्षात आल्यावर त्यांनी आता गेली दोन वर्षे आपल्या मालकीच्या असलेल्या शेकडो कंपन्यांचा ताळेबंदच गेल्या दोन आर्थिक वर्षात सादर केलेला नाही. अशा प्राकेर तटकरेसाहेबांनी आपल्या कंपन्यांचे हे कोंबडे झाकले तरी कोंबडा हा आरवणारच. आता तुम्हाला त्या कंपन्यांचा कारभार गुंडाळता येणार नाही. त्यात जरी काही व्यवहार नसले तरी तुम्हाला कंपन्यांचे ताळेबंद हे सादर करावेच लागतात, याची कल्पना तटकरेंना नसली तरी तुमच्याकडील सी.एं.च्या ताफ्याला जरुर असेल. या कंपन्याच्या माध्यमातून तटकरे यांनी सुमारे तीन हजार एकर जमीन बळकावली आहे. यातील जमिनींची खरेदी ही सर्व कायदे धाब्यावर बसवून झालेली आहे. रायगड जिल्ह्यातील जमीनींच्या असलेल्या किंमती लक्षात घेतल्या तर या जमींनींचे बाजारमूल्य किती होते याचा विचार जनतेनेच करावा. सुनिल तटकरे यांच्या मालकीच्या कंपन्यांनी जमिनी घेतानाही अनेक गैरव्यवहार केले  आहेत. एखाद्या कंपनीच्या नावे जर जमीन खरेदी करावयाची असेल तर त्याची पूर्व परवानगी घ्यावी लागते. परंतु एकाच जमीन अधिग्रहणाच्या परवानगीसमोर कित्येक एकर जमिनींची खरेदी केली गेली आहे. त्यासंबंधीचे पुरावेच आम्ही या श्‍वेतपत्रिकेत सादर केले आहेत. तसेच काही जमीनींचे सात-बारा जोडले आहेत. हे सात-बारा खोटे आहेत असे तटकरे यांना म्हणावयाचे आहे का? आम्ही यासंबंधी जे पुरावे या श्‍वेतपत्रिकेत सादर केले आहेत हे खोटे आहेत हे जर तटकरेंना सिध्द करावयाचे असेल तर आमच्यावर खटला हा भरावाच लागेल. त्यामुळे तटकरेसाहेबांना आम्ही पुन्हा एकदा आव्हान देतो की, आमच्यावर अब्रुनुकसानीचा खटला भराच. आमची लढण्याची तयारी आहे. दूध का दूध और पानी का पानी हे सिध्द होऊन जाऊद्याच.
--------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel