-->
संपादकीय पान शुक्रवार दि. ११ मार्च २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------
वाराणसीतील संघर्ष
----------------------
भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी आपला वाराणसी व बडोद्यातून आपला उमेदवारी अर्ज सादर केला आहे. बडोदा हा गुजरातमधील अत्यंत सुरक्षित असा मतदारसंघ मोदी यांनी निवडला व त्याच्या जोडीला त्यांनी वाराणसीतूनही अर्ज भरला आहे. बडोद्यात त्यांनी आपले लग्न जसूबेन हिच्याशी झाल्याचे प्रतिज्ञापत्रात प्रथमच म्हटले आहे. तसेच त्यांनी आपल्याकडे २९,७०० रुपये रोख पैसे आहेत व हीच आपली मालमत्ता आहे असे जाहीर केले आहे. मोदींची ही एवढी मालमत्ता पाहून कोणालाही हसू येईल आणि देशातील नागरिकांची कशी फसवणूक करीत आहे हेच यावरुन दिसते. मोदी गुजरातमधून कुठून उभे राहणार, हा प्रश्न संघ परिवारासाठी महत्त्वाचा नव्हता; पण २०१४च्या लोकसभा निवडणुकीत मोदींचा होणारा नेत्रदीपक विजय हा गुजरातमधून नव्हे, तर  जातीय समीकरणाची प्रचंड गुंतागुंत असलेल्या वाराणसी मतदारसंघातून झाल्यास ते हिंदूंचे मसिहा ठरतील व तसा संदेश देशातल्या सेक्युलर राजकारण करणार्‍या राजकीय पक्षांना मिळेल, अशी संघ परिवाराची व्यूहरचना होती. संघ परिवाराने मोदींच्या वाराणसीमधील उमेदवारीबाबत भाजपमधील ज्येष्ठ धुरीणांनाही अंधारात ठेवले होते. त्याच्या प्रतिक्रिया नंतर दिसून आल्या. मोदींचे नाव वाराणसीतून जाहीर होणार, याची कुजबुज सुरू होताच वाराणसीतील भाजपचेच विद्यमान खासदार मुरली मनोहर जोशी यांनी खळखळ व्यक्त केली. त्यांनी आपला मतदारसंघ मोदींना सोडण्यास नकार दिला. पण त्यांचा विरोध संघ परिवाराने मोडून काढला व मोदींच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. मोदींची वाराणसीतील उमेदवारी देशाच्या राजकारणातली जशी अनपेक्षित व धक्का देणारी घटना होती तसेच ङ्गआम आदमी पार्टीफचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी मोदींना वाराणसीतून दिलेले आव्हानही अनपेक्षित होते. काल-परवापर्यंत कॉंग्रेसविरोधात रण माजवणारे केजरीवाल थेट मोदींना आव्हान देतील, याची गंधवार्ताही मोदींना व त्यांच्या खुफिया एजंटांना लागली नाही. केजरीवाल यांनी दिलेल्या आकस्मिक आव्हानामुळेच मोदींच्या संभाव्य  विजयाला गालबोट लागेल, अशी चर्चा सुरू झाली. आता मंगळवारी कॉंग्रेसने आपला उमेदवार जाहीर करताना मोदींच्या दिल्लीच्या तख्ताकडे जाणार्‍या रथामध्ये आणखी एक अडथळा आणला आहे. कॉंग्रेसने वाराणसी लोकसभा मतदारसंघात येणार्‍या पिंडरा विधानसभा मतदारसंघातील आमदार अजय राय यांना उमेदवारी देताना जातीय राजकारणाचा विचार केला आहे. कॉंग्रेसने वाराणसीमध्ये एवढ्या उशिरा का उमेदवार जाहीर केला, याचे उत्तर तेथील गुंतागुंतीच्या जातीय राजकारणात दडलेले आहे. एक म्हणजे, या मतदारसंघात मतदारांची संख्या सुमारे १६ लाख आहे. त्यात दोन लाख मते ब्राह्मण समाजाची, सव्वातीन लाख मते बनिया समाजाची, साडेचार लाख मते मुस्लिमांची, सव्वा लाख मते कुर्मी समाजाची, ९० हजार मते दलितांची व सव्वा लाख मते यादवांची, सव्वादोन लाख मते भूमिहार समाजाची व उर्वरित मतदार ठाकूर, कोइरी, कायस्थ या समाजाचे आहेत. या आकडेवारीवर नजर मारल्यास कोणत्याही विशिष्ट समाजाचा या मतदारसंघावर प्रभाव नाही, असे दिसून येते. पण कोणत्याही समाजघटकाचा प्रभाव नाही म्हणजे मतांचे ध्रुवीकरण किंवा सोशल इंजिनिअरिंग होऊ शकत नाही, असे नाही. मायावतींनी ब्राह्मण, ओबीसी, दलित असे अशक्य वाटणारे सोशल इंजिनिअरिंग उत्तर प्रदेशात करून दाखवले होते व या इतिहासाची पुनरावृत्ती मोदींना वाराणसीमध्ये करून दाखवायची आहे. मोदींना हिंदू उच्च जातींची जशी मते मिळवायची आहेत, तसेच त्यांना ओबीसी आणि दलित मतांचेही ध्रुवीकरण करायचे आहे. मोदींना मुस्लिमांची मते महत्त्वाची वाटत नाहीत, याचे कारण वाराणसीमध्ये मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय असली तरी त्यांच्याच बळावर आजपर्यंत कोणी उमेदवार निवडून आलेला नाही. प्रत्येक उमेदवाराला अन्य जातींना चुचकारावे लागते. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, भविष्यात मोदी पंतप्रधान झाल्यास त्यांची प्रतिमा गुजरातचे नेते अशी न ठेवता ती उत्तर प्रदेशासारख्या जातीय राजकारणाने पोखरलेल्या पण मुस्लिमबहुल मतदारांतून निवडून आलेला हिंदू नेता, अशीही स्थापित करण्याचे प्रयत्न आहेत. कॉंग्रेसने अजय राय यांना उमेदवारी देताना याच समीकरणाचा विचार करून मोदींचे मताधिक्य कसे खाली येऊ शकते, याचा अधिक विचार केल्याचे स्पष्ट दिसून येते. कॉंग्रेसच्या दृष्टीने केजरीवाल फॅक्टर महत्त्वाचा आहे, तो या अर्थाने की, मोदींच्या सुपरमॅन प्रतिमेला आव्हान देणारा नेता खुद्द त्यांच्या पक्षातच नाही. त्यातच गेल्या चार महिन्यांत केजरीवाल यांनी एक राजकीय नेता म्हणून देशभरात आपली सर्वांपेक्षा वेगळी प्रतिमा प्रस्थापित केल्याने मोदींना ते आव्हान देत असतील, तर ते कॉंग्रेसच्या फायद्याचे होते. पण केजरीवाल यांना वाराणसीत मतदारांना आपल्याकडे वळवण्यात बर्‍याच मर्यादा आहेत. कॉँग्रेसने अजय राय यांना वाराणसीची खडान्खडा माहिती असल्याने त्यांना कॉंग्रेसची बाहेरून मदतही लागणार नाही. एकंदरीत मोदींना वाराणसीत पराभूत करण्यासाठी एकच नेता उभा करून मतांचे ध्रुवीकरण करण्यापेक्षा अनेक उमेदवार उभे करून मतांचे विभाजन करण्याची राजकीय चाल खेळली गेली आहे. यात आता कोण यशस्वी होतो ते पहायचे. मात्र मोदींना वाराणसीचा विजय वाटतो तेवढा सहज व सोपा नाही ऐवढे मात्र नक्की.
--------------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel