-->
राजन किलाचंद:  दानशूर अनिवासी  भारतीय उद्योगपती

राजन किलाचंद: दानशूर अनिवासी भारतीय उद्योगपती


 राजन किलाचंद: दानशूर अनिवासी भारतीय उद्योगपती
 Published on 01 Oct-2011 Foe PRATIMA
प्रसाद केरकर, मुंबई
दुबईस्थित अनिवासी भारतीय उद्योगपती व डोसल उद्योगसमूहाचे प्रमुख राजन किलाचंद यांनी बोस्टन विद्यापीठातील एका महाविद्यालयाला 25 दशलक्ष डॉलर (सुमारे 124 कोटी रुपये)ची देणगी दिली आहे. किलाचंद यांच्या आई-वडिलांचे नाव या महाविद्यालयाला देण्यात येणार आहे. दानशूर उद्योगपती म्हणून जगात परिचित असलेल्या किलाचंद यांनी यापूर्वी अनेक मोठय़ा देणग्या, प्रामुख्याने शौक्षणिक कार्यासाठी दिल्या आहेत. मात्र आजवरची ही त्यांची सर्वात मोठी देणगी ठरली आहे. एवढेच नव्हे तर बोस्टन विद्यापीठाला मिळालेल्या आजवरच्या देणग्यात ही सर्वात मोठी रक्कम आहे. किलाचंद यांचे बोस्टन विद्यापीठाचे फार जुने संबंध आहेत. किलाचंद हे या विद्यापीठात 1971 मध्ये शिकण्यास आले होते आणि त्यांनी येथे आपला एम.बी.ए. अभ्यासक्रम पूर्ण केला होता. अशा प्रकारे त्यांनी बोस्टनशी असलेले आपले नाते आता देणगी देऊन अधिकच वृद्धिंगत केले आहे. किलाचंद कुटुंबीय हे सध्या दुबईत स्थायिक असले तरी मूळचे मुंबईचे. राजन यांच्या पणजोबांचा मुंबईत 1880 मध्ये मुंबईत कापसाच्या निर्यातीचा व्यापार होता. त्यांचा व्यापार हा प्रामुख्याने ब्रिटनशी होता. लंडनला त्यांचा कापूस निर्यात होई. लंडनच्या लॉरेन्स कुटुंबाशी त्यांचे व्यापारी संबंध जोडले गेले. 19व्या दशकात हे कुटुंब त्यांचे व्यापारातले सहकारीही झाले. राजन यांचे आई-वडील अरविंद आणि चंदन हे मुंबईतलेच. राजन यांचे सुरुवातीचे शिक्षणही मुंबईतच झाले. त्यानंतर त्यांचे परदेशात शिक्षण झाले. त्यानंतर त्यांच्याकडे समूहाचे नेतृत्त्व आले आणि त्यांनी उद्योगाचा व्याप वाढविला. त्यांच्या डोसल उद्योगसमूहाचा व्याप जगभरात पोहोचला. त्यामुळे राजन यांनी आपल्या समूहाचे मुख्यालय दुबईत हलविले. त्यांचा समूह हा प्रामुख्याने अभियांत्रिकी, बांधकाम, उत्खनन, रेस्टॉरंट व उत्पादन क्षेत्रात कार्यरत आहे. भारतात त्यांनी पिझा हट्ची फ्रँन्चाईजी घेतली असून 59 रेस्टॉरंट त्यांच्या मार्फत चालविली जातात. किलाचंद हे मूळचे मुंबईतले असले तरीही त्यांच्या उलाढालीतला फार मोठा वाटा दुबईतल्या उलाढालीचा आहे. त्यामुळे त्यांचा समूह भारतापेक्षा विदेशातच जास्त परिचयाचा आहे. किलाचंद यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी फार मोठय़ा संस्थांना देणग्या दिल्या आहेत. आरोग्य, कुटुंबनियोजनासाठी कार्य करणारी संस्था पाथफाइंडर इंटरनॅशनलच्या संचालक मंडळावर ते आहेत. त्यांनी या संस्थेच्या माध्यमातून एड्स व एच.आय.व्ही.साठी मोठय़ा प्रमाणावर निधी जगात उपलब्ध करून दिला आहे. दुबईच्या शेखने सुरू केलेल्या दुबई केअर या संस्थेलाही त्यांचे मोठे अर्थसाहाय्य लाभते. आजवर त्यांनी आरोग्य, शिक्षण, स्वयंरोजगार, ग्रंथालय उभारणी, शिक्षक प्रशिक्षण यासाठी सुमारे 50 दशलक्ष डॉलर देणगीच्या रूपाने दिले आहेत. बोस्टन विद्यापीठाच्या संचालक मंडळातही ते आहेत. त्यांनी अलीकडेच दिलेल्या बोस्टन विद्यापीठाच्या देणगीचा भारतीयांनाही मोठा फायदा होणार आहे, कारण या विद्यापीठात मोठय़ा संख्येने भारतीय मुलेही शिकतात. 1839 मध्ये स्थापन झालेल्या बोस्टन विद्यापीठात दरवर्षी सुमारे 30 हजार मुले शिकतात. या विद्यापीठात सुमारे विविध विषयाला वाहिलेली 16 महाविद्यालये आहेत. अशा या जागतिक दर्जाच्या विद्यापीठाला एका भारतीयाने एवढी मोठी देणगी देणे ही प्रत्येक भारतीयाची मान उंचावणारी बाब ठरावी. 
Prasadkerkar73@gmail.com 

0 Response to "राजन किलाचंद: दानशूर अनिवासी भारतीय उद्योगपती"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel